पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करून लिहिलेले हे सर्व लेख विचारगर्भ झाले आहेत. या ग्रंथांमुळे संत साहित्याकडे नव्या समाजरचनेस उपकारक अशा दृष्टीने पाहण्याची दिशा मिळते. ही या ग्रंथांची खरी सामाजिक कामगिरी.

 ग्रंथात सर्व ग्रंथ बसवेश्वर, चक्रधर, नामदेव, सावता माळी, ज्ञानेश्वर, तुकाराम, चोखामेळा, सेना महाराज, कबीर, रोहिदास, निळोबा, रामदास, गाडगेबाबा व तुकडोजी महाराजांच्या साहित्याचा परामर्श घेऊन हे संत अंधश्रद्धा निर्मूलनाचे समर्थक कसे होते ते सप्रमाण विशद करण्यात आले आहे. लेखात संतांची वचने उदाहरणापेक्षा प्रमाणाचे, पुराव्याचे कार्य करतात. ग्रंथांची बैठक समाजास विज्ञानाधिष्ठित करण्याची आहे. त्यामुळे प्राचार्य अद्वैतानंद गळदगे यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट करणारा निबंध या ग्रंथाचा प्राण होय. डॉ. तारा भवाळकर, डॉ. एन. व्ही. पाटील, डॉ. शिवशंकर उपासे, डॉ. य. शं. साधू यांचे लेख निर्णायक होत. डॉ. हे. वि. इनामदारांचा लेख श्रद्धा व अंधश्रद्धेच्या सीमारेषा आखणारा आहे. कबीरांवरील अस्मादिकांचा लेख अमराठी संतांचे अंधश्रद्धा निर्मूलन कार्य रेखांकित करणारा आहे.

 प्राचार्य रा. तु. भगतांनी ग्रंथाद्वारे संतांचे पुरोगामित्व वेळीच प्रकाशात आणले. हे साहित्यिक तसेच समाज मूल्यवर्धन करणारे कार्य होय. हा ग्रंथ अंधश्रद्धा निर्मूलन कार्य पुढे नेणारा, विज्ञानाधिष्ठित समाजाचा पुरस्कार करणारा. समाजात समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता रुजवणारा असल्याने त्याचे संदर्भमूल्य मोठे आहे. वर्तमानावर वेळीच प्रहार करण्याची मोठी ताकद या ग्रंथात असल्याने पुरोगामी व प्रतिगामी दोघांच्या डोळ्यांत अंजन घालून त्यांच्यात हा ग्रंथ नीरक्षीर न्याय विवेक निर्माण करणारा वाटतो.


• संत साहित्य आणि अंधश्रद्धा निर्मूलन, (लेखसंग्रह)

 संपादक : प्राचार्य रा. तु. भगत प्रकाशन चैतन्य, कोल्हापूर

 पृष्ठे २३0 किंमत - १७५ रु.

♦♦

वेचलेली फुले/९२