पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्रिवेणी' : गुलजारांच्या काव्याचा मराठी अनुवाद


गुलजार संवेदनशील कवी, तर शांता शेळके भावग्राही अनुवादक! या सुरेख संगमामुळेच साकारली उर्दू, हिंदी नि मराठीची ‘त्रिवेणी', त्रिवेणी हा गुलजारांनी घडवलेला त्रिपदी छंद. तीन दशकांच्या निरंतर रियाजानंतर तो समृद्ध झाला.

 शांता शेळके यांना हिंदी, उर्दची चांगली जाण होती, हे गुलजारांच्या मूळ हिंदीत लिहिलेल्या 'त्रिवेणी' या त्रिपदी गझल संग्रहाचा मराठी अनुवाद वाचत असताना लगेच लक्षात येते. त्यात त्यांचा पिंड कवयित्रीचा. त्यामुळे भाव नि भाषेचा सुरेख संगम या अनुवादात पदोपदी लक्षात येतो. हा अनुवाद हिंदी मराठीस जोडणारा दुग्धशर्करा योग होय. फाळणीनंतर जी माणसे पाकिस्तान सोडून भारतात आली, त्यापैकी गुलजार एक होत. फाळणीच्या वेदनांनी त्यांचे काव्य ओथंबलेले आहे. ते अशा त्रिपदी गझल वाचताना तीव्रतेने जाणवते.

 मी आपले सारे सामान घेऊन आलो होतो बॉर्डरच्या अलीकडे.
  माझे मस्तक मात्र कुणी कापून ठेवून दिले तिकडेच.
  माझ्यापासून अलग होणे रुचले नसेल तिला कदाचित.

 गुलजारांची ‘त्रिवेणी' नामक त्रिपदी अल्पाक्षरी गझल होय. पहिल्या दोन ओळींचा शेर असतात गंगा-यमुना. हा असतो विषय विस्तार. तिसरी ओळ असते सरस्वती. तीत गझलचा आशय अमूर्त,अव्यक्त असतो सरस्वतीसारखा गुप्त, काव्य वाचकांनी स्वानुभवांच्या समृद्धीवर स्वविवेक नि स्वतर्क इत्यादींच्या बळांवर तो जाणून घ्यायचा. त्यामुळे ‘त्रिवेणी समजायची तर कवी नि वाचक यांच्यात अद्वैत भाव, भाषा, भंगिमांचा त्रिवेणी संगम होणे पूर्वअट असते. गुलजारांची कविता अनुभवाच्या समृद्धीसह भाषांतरित करायची तर अनुवादकामध्ये ते सारस्वत कौशल्य, ती साहित्य प्रतिभा असणे अनिवार्य. ती शांता शेळकेंमध्ये होती. ज्या मराठी वाचकांना त्यांच्या 'कॉफी हाउस, प्रत्येक टेबलावर नवा पाऊस,' सारख्या हायकूचे त्रिपदींचे सौंदर्य पेलता आले, त्यांना या ‘त्रिवेणी' म्हणजे नवी पर्वणीच वाटल्याशिवाय राहणार नाही. त्रिवेणी

वेचलेली फुले/९३