पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/194

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बिदर, भालकीसह महाराष्ट्र हे त्यांचं स्वप्न होते. ते आजवर पुरे होऊ शकले नाही. सदर आत्मचरित्रातील ‘संयुक्त महाराष्ट्र आंदोलन' (पूर्वार्ध आणि उत्तरार्ध) वाचत असताना एस.एम.नी महाराष्ट्र निर्मितीसाठी खाल्लेल्या खस्ता वाचल्या की या माणसाच्या उदार व दूरदृष्टीचे कौतुक वाटते. अन् शल्यही वाटत राहते की, त्यांना या लढ्याचे शिल्पकार म्हणून श्रेय दिले गेले नाही याचे.

कामगार चळवळ

 वर्गविग्रहाच्या साधनानेच समाजवादी क्रांतीच काय, पण सर्व सामाजिक परिवर्तने होतात, हा कार्ल मार्क्सचा सिद्धात आहे. समाजवादी विचाराचा तो पाया होय. आणि याच तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवून एस.एम. सन १९३० पासून कामगार चळवळीशी जोडले गेले होते. रेल्वे कामगार संघटना, टेक्सटाइल लेबर असोसिएशन, पाचशे बारा कमांड वर्कशॉप युनियन, स्टेट बँक युनियन, खडकी अॅम्युलेनिशन फॅक्टरी युनियन, इत्यादी युनियन्स मार्फत एस.एम. यांनी कामगारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. या युनियन त्या वेळी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसशी संलग्न होत्या. त्यांच्यामार्फत वेतन वाढ, कामाचे तास, शहर दर्जा नि भत्ता, बोनस, भरती, निलंबन, कामावरून कमी करणे इत्यादी प्रश्न एस.एम.यांना हाताळावे लागले. कम्युनिस्टांशी मतभेद होऊन त्यांनी हिंद मजदूर सभा स्थापली. कामगार प्रश्नांबरोबरीने एस. एम. जोशींनी कुटुंब नियोजन, व्यसनमुक्तीसारख्या प्रश्नातही त्या वेळी लक्ष घातले होते. राष्ट्रीय दृष्टिकोन न सोडता आणि सामाजिक कर्तव्याची जाण ठेवून एस.एम. कामगार चळवळीत उतरले होते. तो विचार व व्यवहार त्यांनी शेवटपर्यंत पाळला. त्यामुळे उच्चाधिकारी एस.एम.यांचेवर विश्वास ठेवून बोलणी, तडजोडी करीत. एस. एम. शब्द पाळीत. त्यामुळे ते ज्या युनियनचे नेते होते, त्या युनियनला एक प्रकारची क्रेडिबिलिटी' प्राप्त व्हायची. ते राष्ट्रीय राजकीय नेते असल्याने पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, सचिव सर्व पातळ्यांवर त्यांच्या शब्दाला वजन असायचे ते नैतिक अधिष्ठानामुळे. युनियनमध्ये एस.एम. नी लोकशाही रुजवली. कामगार नेतृत्वास वाव दिला. युनियनमध्ये सामाजिक बांधिलकी रुजवली. त्यामुळे मी-एस.एम.' मधील कामगार चळवळ : काही अनुभव' (भाग १,२) वाचत असताना एका सच्चा कार्यकर्त्यांच्या संघटन कौशल्याची प्रचिती येते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे 'कामगार वर्गाचे हित प्रधान' हे तत्त्व. त्याच्याशी कधी एस.एम.नी प्रतारणा केली नाही. प्रत्येक वेळी यश आले असे झालं नाही. पण ध्येयाशी बांधील राहून ते शेवटपर्यंत लढत राहिले. त्याचा आधार होता एकीचे बळ व नेतृत्वावर विश्वास.

वेचलेली फुले/१९३