पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 नेपाळ नावाचं गूढ' : छायाचित्रात्मक प्रवासवर्णन


 माणूस जगात असतो. जगताना विविध अनुभव घेत असतो. ते अनुभव त्याला अस्वस्थ करतात. त्या अस्वस्थतेवर त्याचा विचार होतो. त्या विचारातून एक संचित तयार होऊन, त्याच्या हाती येते. मग ते संचित व्यक्त करण्यासाठी तो तळमळत असतो. मग कधी लेखणीने तर कधी कुंचल्याने, तर कधी कॅमे-याने तो ते अभिव्यक्त करत असतो. त्यातून साकारते ती कलाकृती. मिलिंद यादव यांचेही असेच झाले. गळ्यात कॅमेरा अडकवून फिरत असताना एक बक-यांची टक्कर त्याचे लक्ष वेधते. कॅमे-यात जाते. मती, गती, युक्ती, शक्ती साऱ्यांचे संचित असलेले ते छायाचित्र दै. 'सकाळ'च्या छायाचित्र स्पर्धेत पाठवले जाते. राज्यात त्याला नंबर मिळतो. पुरस्कार म्हणून ‘सकाळ मिलिंद यांना नेपाळचा प्रवास घडवून आणतात. यादव यांना प्रवास घडला. तो त्यांनी छायांकित केला. चित्राला शब्दांची जोड मिळाली आणि त्याचं एक पुस्तक झालं. त्या प्रवास वर्णनाचे नाव...'नेपाळ नावाचं गूढ...'

 |हे पुस्तक शीर्षक नि मुखपृष्ठापासूनच वाचकांची पकड घेते. एक गूढ जिज्ञासा त्याच्या ठायी आकारते ती पाने चाळता चाळता, हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य. ते मुखपृष्ठापासूनच तुम्हाला नेपाळच्या प्रेमात पाडते. आकार, बांधणी, मांडणी, सजावट, मनोगत समजून घेत आपण या नेपाळ नावाच्या गूढात गढून जातो अन् मग लक्षात येते नेपाळ हे गूढ आहे खरे. हिंदू व नि बौद्ध अशा कर्मकांडी आणि कर्मकांडमुक्त, धर्मप्रणाली राजेशाही व मार्क्सवादी अशा टोकाच्या राज्यप्रणाली, सौंदर्य अन् विरूपता, हिंसा अन् अहिंसा, ज्ञान अन् अज्ञान, परंपरा अन् नवता. यांच्या संघर्षातही नेपाळ आपली लोकसंस्कृती, निसर्ग नि वैविध्य कसे टिकवून आहे याचे आश्चर्य वाटत राहते.

 नेपाळ हा निसर्गात नि मानवनिर्मित साहित्य, कला, संस्कृतीतील आखीव, रेखीव देश आहे. इथला निसर्ग त्याचे नानाविध रंग आपल्याला मोहून टाकतो. इथले सोनेरी ऊन, शुभ्र बर्फ, लोकांतील लाल रंगाचे आकर्षण, वस्त्र लाल, हिंसा लाल...हिरवाईत दडलेले लाल आकर्षण गूढ नव्हे तर काय? हे सारे मिलिंद यादव आपल्याला छायाचिताद्वारे समजावतात. यातील प्रत्येक छायाचित्र

वेचलेली फुले/१३६