पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणजे नेपाळच्या अभिजात निसर्ग अन् लोकसंस्कृतीचा नजराणा, हिरवी शेतं, माणसे, पोषाख, दागिने, पदार्थ, घरे, परंपरा केवळ अन् स्तूप... या सा-यांतून गूढ उकलणारा नेपाळ मूर्त होतो... नेपाळला प्रत्यक्ष भेट न देताही तो पाहण्याचा आनंद देणारं हे पुस्तक... प्रत्यक्षाहून प्रत्यक्ष प्रचिती देणारे.

 छायाचित्रांना मिलिंद यादव यांनी वर्णनांनी गुंफले आहे. त्यामुळे ती छायाचित्रे बोलकी होतात. या प्रवास वर्णनास संवादाचे रूप येते. नेपाळ छायांकित करणारा हा लेखक मुळात एक कलाशिक्षक आहे... तो पुरोगामी विचारांचा कार्यकर्ता आहे...लोकजीवन पाहण्याची त्याची एक दृष्टी आहे. त्यामुळे छायाचित्रावरील त्याचं भाष्य तितकेच मननीय झाले आहे. त्यातून अनेक गोष्टी कळतात. तिथे बुद्धीची समागमन करणारी एक मूर्ती सर्रास विकली जाते. (कदाचित तीच पाहून रजनीशांना ‘संभोगातून समाधी'कडे शीर्षक सुचले असावे.) नेपाळच्या रिसॉर्टमध्ये वीज नसते. शहरात वृद्धांच्या विश्रांतीसाठी खास थांबे, निवारे बांधलेले आढळतात. या नि अशा अनेक गोष्टींतून नेपाळचे गूढ आपणास उलगडत जाते.

 मराठी साहित्य आता शब्दाकडून दृश्याकडे, कल्पनेकडून वास्तवाकडे, परंपरेकडून पर्यटनाकडे अग्रेसर होत असल्याचे भान देणारे हे पुस्तक रंगीबेरंगी चित्रांच्या इंद्रधनुषी साजसज्जेमुळं इतकं मोहक, लोभस झालेय की वाचक विचार करू लागतो की नेपाळ चित्रात इतका सुंदर तर प्रत्यक्षात किती असेल? हा प्रश्न हेच या पुस्तकाचे यश. पुस्तकातील शुद्धलेखनाच्या चुका, पृष्ठ क्रमांक नसणे इत्यादी दोष दुस-या आवृत्तीत दुरुस्त झाल्यास पुस्तकाची उपयुक्तता वाढेल असे वाटते.


• नेपाळ नावाचं गूढ... (प्रकाशवर्णन)

 लेखक - मिलिंद यादव
 प्रकाशक - निर्मिती विचार मंच, कोल्हापूर

प्रकाशन वर्ष २00८  किंमत - ५00 रु.
वेचलेली फुले/१३७