पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नामदारनामा' : व्यक्ती चित्राद्वारे आत्मकथाचा प्रयोग


 अलीकडे मराठी भाषेत आत्मकथेस कथा, कादंबरीची पत लाभली आहे. त्याचे कारण तिच्यात असलेले अनुभवाचे अप्रूप जसे आहे तसे लेखनशैलीचे वैविध्यही! प्रा. कमलाकर दीक्षित यांचा ‘नामदारनामा' वाचताना ते प्रकर्षाने लक्षात येते. काही वेळा ठेवणीतल्या चिजा झाकल्या माणकांसारख्या दुर्लक्षित राहतात. त्या अडगळीत पडल्यामुळे ‘नामदारनामा' प्रकाशित होऊन सहा महिने उलटून गेले तरी वर्तमानपत्रे, मासिकांच्या संपादकांनी त्याची दखल घेऊ नये याचे मोठे आश्चर्य वाटते. आजकाल वाचक प्रशस्तीनंतर आपली पसंती देतात. पण प्रशस्तीमध्ये अस्सलपणा जोखण्याचे कसब पुस्तक परीक्षण करणा-यांमध्ये राहिलं नाही हे मात्र खरे!

 हे सारे ‘नामदारनामा' वाचताना लक्षात आले. कमलाकर दीक्षित हे इंग्रजीचे प्राध्यापक असले, तरी मराठीचे चिकित्सक वाचक व आस्वादक आहेत. त्याच्या लेखनाला एक टोक आहे. नेमकेपणाने ते आपला आशय वाचकांपर्यंत पोहोचवतात. त्यांच्यात एक बेरका निरीक्षक व खिल्लीबाज शैलीकार दडलेला आहे. प्रा. म. द. हातकणंगलेकरांच आत्मचरित्र मध्यंतरी मी असेच वाचले. ‘उघडझाप' त्याचे नाव. माणसाच्या उत्तरायणाचा काळ हा आयुष्याच्या स्मृतींची उघडझाप असते. ती लेखकांनी सुट्या सुट्या लेखांतून मांडली आहे. लेख सुटे असले तरी त्यात एका व्यक्तीच्या जीवनाचा सूत्रबद्ध प्रवास लक्षास येतो. नामदारनामाचा बाज यांच्या जवळचा असला, तरी हा बाज वेगळा आहे खरा. इथे 'व्यक्तिचित्रे' हे माध्यम घेऊन कमलाकर दीक्षितांचं जीवन स्पष्ट होतं.

 ‘नामदारनामा' शीर्षकातच ही आत्मकथा असल्याचे सूचकपणे स्पष्ट होतं. 'बाबरनामा', ‘हुमायूनामा', अकबरनामा', तसाच हा ‘नामदारनामा'. ‘नामदार' ही वतनदारी, जमीनदारी, पाटीलकी, कुलकर्णीगिरीची खानदानी श्रीमंती स्पष्ट करणारी बिरुदावली. दीक्षितांचे आजोबा या अर्थाने नामदार. तिचा पाझर कमलाकर दीक्षितांमध्येही आढळतो, हे वेगळे सांगायला नको. दीक्षितांनी 'हंस', 'अंतर्नाद' ‘दक्षिण महाराष्ट्र केसरी'सारख्या मासिक नि वृत्तपत्रातून

वेचलेली फुले/१३३