पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/133

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सावरताना दागिना मिळाला नाही तर तिचं सौभाग्य प्रश्नांकित होते. मरताना सुया टोचल्या जातात भूत होऊ नये म्हणून! इथे स्त्रीला मुलगी झाली तर अरण्यरुदन! पण पाळलेल्या म्हशी, डुक्कर, गाढवाला मादी झाली की आनंदोत्सव! या साऱ्या भेदाभेदाच्या जगण्याचे चित्रण करणारे हे पुस्तक संस्कृतीचे नवे अध्याय मागते. वाचकास अडचणीत आणणारे हे पुस्तक तुम्हास स्त्रीपणाचा कळवळा देऊन थांबत नाही तर ते स्त्रीविषयीच्या कळकळीची नवी सामाजिक भावसाक्षरता तुमच्यात जागवते. हे या पुस्तकाचे सर्वांत मोठे सामाजिक व साहित्यिक योगदान.

 एकविसाव्या शतकातील मराठी साहित्य दलित, सवर्ण, स्त्री-पुरुष, वंचित, उपेक्षित, शहरी, ग्रामीण गावचे गावकुसाबाहेरचे असे भिंत बंदिस्त असणारं नाही. बर्लिनची भिंत पडली. चीनची अजस्त्र भिंतपण पडेल, अशी उदारमतवादी आश्वासक उमेद जागवणारे हे शतक. या शतकाचे साहित्य केवळ 'माणूस' या निकषावर तोलले जाईल. मानव अधिकार असेल त्याच्या जगण्याची कसोटी नि आधार. जात, धर्म, कुल, गोत्र या पलीकडे जाऊन शोषणमुक्त, अंधश्रद्धामुक्त, शिक्षित, विज्ञाननिष्ठा समाजरचनेचा नवा खेळ मांडणारे हे शतक असल्यानं विमल मोरेंनी दलित, ललित, कथन, आत्मकथन अशा मान्य चौकटींना विराम देऊन लिहिलेल्या या पुस्तकासाठी मराठी समीक्षेस नवी साहित्यिक परिमाणे शोधून काढावी लागतील. हे पुस्तक आत्मकथन की अनुकथन, व्यष्टी का समष्टी, दलित की ललित, वैचारिक की वृत्तान्तात्मक, सामाजिक की साहित्यिक असे अनंत प्रश्न उभे करणारे नि म्हणून मराठी साहित्यात मन्वंतर घडून आणणारे ठरेल. ते नव्या साहित्यशास्त्राची मागणी करेल. ते जुन्या भिंती पाडून नवे प्रवाह देईल. नवे प्रवाह मध्यप्रवाहात आणील.


• पालातील माणसं (आत्मकथन)

 लेखिका - विमल मोरे,
 प्रकाशक - पद्मगंधा प्रकाशन, पुणे
 प्रकाशन वर्ष - २००७,

 पृष्ठे - १६४  किंमत - १२०
वेचलेली फुले/१३२