पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 तुमच्यातल्या माणसास विरघळून टाकणा-या अमानुष विषमतेविरुद्ध या संग्रहातील प्रत्येक कविता तीव्र आक्रोश ओकत राहते. वाचून वाटते असे ‘टॉवेलचं जीवन' कुणीही यावे पुसावे- कुणाच्या वाट्यास येऊ नये.

 या कविता तुम्हास नव्या जगाची नवलाई दाखवतात. इथल्या बारक्याला समलिंगी संबंधातून थानं फुटतात, इथली भाषा शिवीशिवाय शून्य. मालक म्हणजे माणसास लागलेला जळू, भूक नसताना पैशाची मस्ती दाखवायसाठी आलेली मस्तवाल गि-हाइके, श्रीमंतीचा कैफ उतरवण्यासाठी येणारी माणसे, बाई नि ब्रॅंडीच्या बाटलीत आपली रग नोटेसारखी वेश्यांना चुरगाळत, पान चघळत, माणसावर कशी थुकतात...चोरून चुंबन घेणारी, मांडीत मांडी घालून तुमच्या मांड्या खवळून टाकणारी...इज्जतीचा लिलाव करणारी, दादा, भाई, नवरोजी असा बेरका प्रवास करणारे संभावित ... अशा माणसांचे बुरखे फाडणारी, समाजाचे खायचे दात दाखवणारी कविता तुमच्यात माणुसकीचा पाझर फोडते. अशासाठी की इथे आता माणुसकीचा मळा फुलायला हवा.

 हॉटेल, रेड लाईट एरिया, लॉज हे एक असे जग आहे की ते बाहेरून चकाकत असले तरी आतून जळत असते... इथे सारे पैशावर जोखले जाते. हे सारे वरच्या जगाचे. खालचे जग माणुसकीने प्यासे असते... तिथे वेदना हेच नात्याचं बंधन असतं. त्यामुळे वेश्या नि वेटर आपसूक भाऊ-बहीण असतात.

 ‘हॉटेल माझा देश'ची कविता भाषेच्या अंगांनी दलित कवितेच्या जवळ जाणारी ढसाळी असली तरी तिचा अंतर स्वर, जात, धर्म पंथ यांच्या पलीकडे जाऊन वंचितांच्या वेदना प्रकट करणारी नि म्हणून वेगळी वाटते. आंबेडकरी कुंपणाच्या पलीकडे जाऊन वैश्विक नि निखळपणे सामाजिक न्यायाच्या कसोटीवर माणसास तोलणारी ही कविता आपणास अधिक भावते ती तिच्यातील सामाजिक संतुलनाच्या जाणिवेमुळे. तशी ही कविता एक छोटे जग दाखवणारी, तिला अनुभवाच्या मर्यादा आहेत. भाषेचे कुंपण आहे. त्यात ती अडकते पूर्व संस्कारामुळे. पण तिला नव्या क्षितिज शोधाचा ध्यास आहे. त्यासाठी या कवितेने, कवीने आता हॉटेल पल्याडले व्यापक जग धुडाळायला हवे. कुपमंडूक जग ओलांडल्याशिवाय तुम्हास वैश्विकतेचा शोध घेता येणार नाही याचे भान यायचे तर कवीन व्यापक जग वाचले पाहिजे.


• हॉटेल माझा देश (काव्यसंग्रह)

 लेखक - धम्मपाल रत्नाकर
 प्रकाशक - समृद्धी, १७०७ बी, मंगळवार पेठ, कोल्हापूर
 प्रकाशन वर्ष - २00६

 पृष्ठे - ९८  किंमत - ८0 रुपये

♦♦

वेचलेली फुले/१२६