पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/126

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हॉटेल माझा देश : वेटर व वेश्यांसंबंधांचे काव्य


 माणसं माणसाशी माणसासारखी वागावीत, शेकडो वर्षांपासून सुरू असलेले माणसाचे शोषण संपावे, माणूस माणसाजवळ जावा, हॉटेलातील समतेसारखी समता प्रस्थापित व्हावी... हा देश हॉटेलसारखा समतेचा सागर बनावा' अशा ध्यासातून माणूस नि माणुसकीस केंद्र करून लिहिलेल्या कवितांचा संग्रह म्हणजे ‘हॉटेल माझा देश' प्रा. डॉ. धम्मपाल रत्नाकर या तरुण नि संवेदनशील कवीच्या या कविता तुम्हास माणुसकीचा मळा फुलविण्याच्या महत्त्वाकांक्षेने माणुसकी नसलेले नि माणसास नासवणारे जग दाखवतात. या काव्यसंग्रहाचे हे पाथेय.

 डॉ. रत्नाकर अशा हजारो देशबांधवांचे प्रतीक आहेत जे पोट भरण्यासाठी गावकुसातले जीवन सोडतात नि शहरात येतात. गावाकडच्या उपेक्षित जीवनाची उबग आल्याने जी तरुण मंडळी मृगजळामागे धावत शहरात आली त्यांना इथल्या महानरकाने उबग आणला. गावाकडची जातीयतेची उतरंड, विषमता त्यांनी अनुभवली असल्याने त्यांना हॉटेल लाईन समतेची पंढरी वाटते. त्याचे कारण हॉटेलात जात, धर्म, पंथ या पलीकडे एक माणुसकीचा पाझर झरत राहतो. डॉ. रत्नाकर आपली पडझड संपावी म्हणून हॉटेलात वेटर, कॅशियर, क्लिनर, व्यवस्थापक अशी सारी कामे करतात. या प्रवासात त्यांना जे नवे जग गवसते ते डॉ. रत्नाकर माणुसकीस गवसणी घालत तुम्हास या कवितेतून दाखवतात नि वाचक ते सारे पाहुन सुन्न होतो.

 हॉटेल आहे या कवीचा देश. 'भारत माझा देश आहे...' प्रतिज्ञेतला नयनरम्य भारत त्याला इथे गवसत नाही. त्याला लक्षात येते की ही व्यवस्था माणसास पायताणा जवळचे जीवन जगण्यास भाग पाडते. राष्ट्र, राष्ट्रध्वज या संकल्पनेवरचा त्याचा विश्वास उडून जातो. ही कविता माणूस नि घटना तुडवणाच्या या देशात ‘जातीयतेला गाढव लावायला हवे' म्हणत सरळ व्यवस्थेविरुद्ध जिहाद पुकारताना दिसते. सभ्यतेचे सारे संकेत नाकारत ही कविता हॉटेल कामगार, दलित, उपेक्षित, वेश्या यांच्या रोजच्या भाषेत आपल्या साऱ्या व्यथा, वेदना ऐकवते. इथे कष्टांना किंमत नसते. सिगारेटच्या तुकड्यासारखे तुम्हास सतत जळत रहावे लागते. मुतारीच्या डांबर गोळीसारखे वितळत

वेचलेली फुले/१२५