पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/9

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 माणूस एकाचवेळी 'स्वान्तःसुखाय' वाचतो नि 'परसुखाय' ही. स्वतः वाचलेलं दुसऱ्यास सांगण्याची त्याची आतुरता म्हणजे स्वान्तःसुखायचा परसुखाय झालेला कायाकल्प! या अशा स्थित्यंतरातूनच वाचनाने जग बदलते 'जे जे आपणासी ठावे, ते ते दुसऱ्यासी सांगावे' चा भुंगा... तो गुंजारव मना-कानात सतत गुंजत, घुमत राहतो. म्हणून माणूस वाचत राहतो. वेळ काढण्यासाठी वाचणारा कधी काळचा माणूस, रंजन ही त्याची एकेकाळची भूक होती. आज तो वाचनाने शहाणा, सूरता झाला नि माहितीसाठी वाचणारा माणूस ज्ञानपिपासू बनला. पूर्वीचं रंजक वाचन ही रंजक साहित्याची (Penny Literature) परिणती होती. आज माणूस कल्पनेपेक्षा वास्तववादी, जीवनोपयोगी, ज्ञानपर साहित्य (Pretious Literature) वाचू मागतो. कारण त्याचं जीवन आज संघर्षमय, स्पर्धात्मक झालंय रंजनाची उसंत सरली नि जीवन जगणं अनिवार्य होऊन तो जगण्याचा चक्रव्यूह भेदण्यास सरसावलाय.

 पुस्तकं सुजाण सन्मित्रांसारखी असतात. ती तुम्हास कधीच एकटी पडू देत नाहीत. ती संकटप्रसंगी तुमचे मार्गदर्शक बनतात. तुम्हास हात देतात नि संकट निभावून जातं. बहुश्रुत वाचन (Multiple Reading) बहुगुणी औषधासारखं असतं. ते प्रत्येक विकारावर मात करत तुम्हास विचारी बनवतं. वाचनाने मनाचा भ्रमनिरास होऊन जग लख्ख दिसू, भासू लागतं. वाचन दिशा असते तसा दिलासाही. वाचनाने विचार स्पष्ट होतात. माणूस पारदर्शी बनतो. म्हणून तर वाचनास ज्ञानप्राप्तीचे महाद्वार (Gateway of Knowledge) म्हटलं आहे. स्थल, कालाच्या सीमा ओलांडणारं बहुभाषी, बहुआयामी वाचन म्हणून तर श्रेष्ठ असतं. घर, संसार, गृहस्थीच्या रगाड्यात, वाताचक्रात वाचनच आपला धीर बनतो नि ध्यासास ध्येय बनवतो. इतकं वाचल्यावर माझं मतच होऊन गेलंय की माणसानं काहीही वाचावं. ते कधीच वायफळ नसतं नि वाया जात नसतं. निरूपयोगी वाचन अस्तित्वातच नाही नि नसतं.

 जो वाचत नाही तो केवळ अडाणीच नाही राहात तर तो कालबाह्यही ठरत जातो. 'कायदा पाळा गतीचा, थांबला तो संपला' हे जीवनाइतकेच वाचनासही लागू आहे. रद्दीतही रत्ने असतात म्हणजे काय ? 'No word is useless.' पुडीचा कागदही तुम्हास अभिजात सुख देऊन जातो. जीवनोपयोगी वाचन हे वर्तमान काळातील वाचन व्यवहाराचे ब्रीद होऊन बसले आहे. पण त्यामुळे ललित मनोहारी भाषा व साहित्य सौंदर्यास

वाचावे असे काही/८