पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



वाचन : एक मुक्त चिंतन

 वाचन असतं काय? वेड, व्यसन, व्यासंग, शिळोप्याचा उद्योग की प्रतिबद्ध व्रत! मी हे अद्याप ठरवू नाही शकलो. पण एक मात्र खरं की त्याच्याशिवाय मला चैन नाही पडत. आयुष्याच्या एका वळणावर मी एकटा होतो. एकांतच माझा सोबती होता आणि जीवन म्हणजे एक मोठी निर्वात, निर्मनुष्य पोकळी होती. त्या हुरहरी, झुरझुरीच्या दिवसात वाचनानी माझी जी साथ-संगत केली ना त्यांनी मी भरून पावलो नि माझी पोकळी भरून निघाली. वाचन माणसाला गुंतवतं नि गुंत्यातून सोडवतंही! माणूस वाचतोच का मुळी? असं जर तुम्ही मला विचाराल तर मी सांगेन की वाचन हा एक आत्मशोध असतो. माणूस बालपणापासून ते आयुष्याच्या अंतापर्यंत सतत नित्यनूतन वाचत राहातो. गोड गोष्टी, चांदोबा, परीकथा, कुमारकथा, संस्कारमाला, राक्षस, देव, दैत्यकथा, आख्यायिका, बोधकथा, रूपककथा, कादंबरिका, शिकार कथा, हेर कथा, शृंगार कथा, विज्ञानकथा, आत्मकथा, चरित्र, प्रवासवर्णन, तत्त्वज्ञान, गूढकथा सारं पालथं घातलं तरी वाचनाची असोशी, तृष्णा, तहान काय थांबत नाही, थकत नाही. वाचन ही एक अतृप्त तहान खरी.

वाचावे असे काही/७