पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/84

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 पहिली गोष्ट अशी की शेक्सपिअर समजून घ्यायला हे चांगलं पुस्तक आहे. लेखकाने नव्या, विशेष आवृत्तीच्या निमित्ताने पुस्ती जोडली आहे. त्यामुळे शेक्सपिअर समकालाशी जोडला गेला आहे. ज्यांना शेक्सपिअरच्या जीवन व साहित्यात जिज्ञासा आहे, त्यांची तृप्ती करण्याचं सामर्थ्य या ग्रंथात आहे. शेक्सपिअरची सारी नाट्ययात्रा हे पुस्तक आपणास घडवते. याला नव्या विशेष आवृत्तीचा भाग म्हणून माधव वझेंनी 'एलिझाबेथन रंगभूमी आणि नंतर' नावाने जोडलेला लेख वाचकांना नाटकांच्या नव्या दुनियेत नेतो. वाचताना वाटत राहतं की आपण नवं जग पाहात आहोत. शिवाय यात कृष्णधवल आणि रंगीत छायाचित्रे आहेत. ज्यांनी या नाटकांवरचे चित्रपट किंवा नाटके पाहिली असतील त्याचं या पुस्तकामुळे छान स्मरणरंजन होते. परिशिष्टातील नाटक व कवितांच्या सूचीमुळे नव्या वाचकांना पुस्तके शोधून मिळवून वाचणे सोपे होते. शेक्सपिअरकालीन घटना, प्रसंग, परंपरा इ. बद्दल यातली माहिती वाचत वाचक शेक्सपिअरच्या काळात केव्हा जातो ते त्याचे त्याला कळत नाही.

 विल्यम शेक्सपिअरचा काळ म्हणजे सोळावे-सतरावे शतक. त्यापूर्वी युरोपात ग्रीक रंगभूमीवर धार्मिक नाटके होत. रोमन रंगभूमी तशी मुक्त होती. या मुक्ततेतून ती अश्लील होत गेल्याने इ. स. ६०० ते १००० पर्यंत नाटकांवर बंदी होती. नंतर नाटकातील प्रसार क्षमता लक्षात घेऊन धर्म प्रसारार्थ ती उठवण्यात आली. चौदाव्या शतकात धर्मातील चमत्कारांचा विरोध करणारे निबंध लिहिले गेले. त्यातून साहित्य, नाटक, कला धर्म व राजसत्तेच्या जोखडातून मुक्त झाले व ते लोकांचे नि लोकांसाठी झाले. पूर्वी ते राजे, अमीर, उमरावांसाठी खेळले जायचे. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात राजा आठवा हेनरीने कलाविष्कार मुक्त ठरविला, तर त्या शतकाच्या उत्तरार्धात राणी पहिली एलिझाबेथने त्याचा पाठपुरावा केला.

 पूर्वी नाटके शाळा, विद्यापीठात होत. पण जनतेचं नाटक म्हणून ते चक्क खाणावळीतच होत असे. खाणावळीत का तर तिथे प्रवासी, व्यापारी, सैनिक, निरोपे येत, जात, उतरत, राहात, जेवत, झोपत. धर्मशाळाच म्हणा ना! शेक्सपिअरच्या काळातच नाटकासाठी स्वतंत्र गृह (थिएटर) सुरू झालं. नाटक दोन तासाचं. पण येण्याजाण्याला दोन-दोन तास घालवावे लागायचे. लोक घोड्यावरून नाटक पाहायला यायचे. नाटकात लक्ष लागावं म्हणून घोडे सांभाळायला मुले ठेवली जायची. प्रेक्षक व नट यांच्यात दरी नव्हती. नटाने पात्रावर तलवारीने हल्ला केला की प्रेक्षक वाचवायला

वाचावे असे काही/८३