पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/77

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वाचायला हवे. इंदुमती राणीसाहेब या प्रिन्स शिवाजी महाराजांच्या पत्नी. राजर्षी शाहू महाराजांनी वधु परीक्षा कशी, कुठे, कधी घेतली हे वाचणे म्हणजे काळ समजून घेणे. आपल्या सुनेस सुपुत्राच्या अकाली निधनाने अकल्पित वैधव्य आल्याचे राजर्षी शाहू महाराजांचे दुःख नि नंतर आपल्या निधनापर्यंत त्यांनी इंदुमती राणीसाहेबांच्या शिक्षणासाठी घेतलेले कष्ट नि प्रयत्न पाहिले की शाहू महाराजांची स्त्री शिक्षण व विकासाची दृष्टी काळाच्या किती पुढे होती ते लक्षात येते, आणि त्यांच्याबद्दलचा आदर द्विगुणित होतो.

 हे पुस्तक अनेक अर्थाने वाचनीय आहे. एकतर यात "विस्मृतिचित्रांचा पार्श्वपट' म्हणून जी पन्नास पानांची प्रस्तावना आहे, ती महाराष्ट्राच्या स्त्री शिक्षणाचा विकास' सांगणारी आहे. ही प्रस्तावना म्हणजे छोटा शोध प्रबंधच होय. यात ब्रिटिश व एतद्देशीय स्त्री-पुरुषांनी स्त्री शिक्षण विकास संदर्भात वेळोवेळी कशी पावले उचलली ते विस्ताराने समजून येते. स्त्री- पुरुष दोघांनी समानपणे हे प्रकरण वाचायला हवे. ते अशासाठी की स्त्री- पुरुष समानतेची वाट त्यातून सुकर होईल. हे पुस्तक केवळ वरील तीन चरित्रांसाठी वाचायला हवे असे नाही तर स्त्री शिक्षण विकासाच्या वाटेवर ज्या विकासोन्मुख स्त्रियांनी आपल्या धडपडीच्या पाऊलखुणा उठवल्या अशा एकूण २० स्त्री चरित्रांचा त्यात समावेश आहे.

 पैकी मेरी कार्पेटर आणि रेबेका सिमियन यांची धडपड वाचली की लक्षात येते की विदेशी असून या विदुषींना येथील स्त्रिया शिकाव्यात म्हणून किती तळमळ होती. मेरी कापेंटर यांनी वंचित बालकांसाठी, त्यांच्या शिक्षण व पुनर्वसनासाठी ऐतिहासिक कार्य केले होते. तसेच कार्य त्या भारतात करू इच्छित होत्या. त्यासाठी त्या चारदा भारतात आल्या. हा काळ साधारण १८६६ ते १८७० चा. अहमदाबाद, सुरत, मुंबई, पुणे अशा चार ठिकाणी त्यांनी स्त्री शिक्षण चळवळ सुरू केली. लोकहितवादी गोपाळराव देशमुख यांचे त्यांना साहाय्य लाभले. मेरी कार्पेटर यांनी आपल्या देशात मुलींसाठी नॉर्मल स्कूल सुरू केली. अनाथाश्रमांना भेटी दिल्या. डेव्हिड ससून इंडस्ट्रीयल स्कूलप्रमाणे मुलींसाठी उद्योगशाळा सुरू करण्याची कल्पना मेरी कार्पेटर यांची. इंग्लंडप्रमाणे त्यांनी इथे सोशल सायन्स असोसिएशन सुरू करून समाजसेवा शिक्षण सुरू केले. तिने भारतीय स्त्री शिक्षणाचा आराखडा भारतमंत्र्यांना सादर केला होता. भारतीय स्त्रियांना वैद्यकीय शिक्षण देण्याचे कार्य रेबेका सिमियननी केले. आज भारतात हजारो स्त्रिया

वाचावे असे काही/७६