पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/36

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आलेले शिक्षण व समृद्धी यांच्या लक्ष्मी-सरस्वतीच्या पाऊलखुणा घरी उठल्या का याची कसोटी हीच की तुमच्या घरी 'राजर्षी शाहू गौरव ग्रंथ' आहे का? असेल तर तो वाचलात का? वाचला असेल तर त्यातील विचार आणि आचार अद्वैताचे प्रतिबिंब तुमच्या वर्तमान जीवनात पडले आहे का? कोणतेही राष्ट्र वा राज्य केवळ शिक्षण प्रसार-प्रचारांनी कधीच मोठे होत नसते. मोठेपण येते ते मोठ्यांचं मोठेपण आपण अंगिकारतो का? या प्रश्नांनी निर्माण केलेल्या जिज्ञासेने. ती निर्माण करण्याचे सामर्थ्य या गौरव ग्रंथात आहे. गौरव ग्रंथ म्हणजे एका व्यक्तीचे गुणगान नसून पिढ्यान्तपिढ्या जो ग्रंथ नव्या पिढीस गौरवपूर्ण करण्याची प्रेरणा, दृष्टी देतो तो. असा हा ग्रंथ घरोघरी जाईल तर तेथील सर्वांचे जीवन सामाजिक न्यायाचे बनवून प्रत्येक वाचकास वंचितांचा वाली बनवेल. पण त्यासाठी लक्षात असू द्या - विकत घ्यायला लागतंय आणि वाचायलाही!

◼◼

वाचावे असे काही/३५