पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/151

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

काळाची पावले ओळखून आपले तत्त्वज्ञान नव्या आव्हानांना कसे तोंड देऊ शकेल याचे कॉ. गोविंद पानसरे यांचे स्वतःचे म्हणून स्वतंत्र आकलन असायचे. त्याचे प्रतिबिंब या समग्र लेखनात आहे.

 ते समाजवादी लोकशाही मानत. भांडवलधार्जिणी लोकशाही म्हणजे विषमता व शोषणास आमंत्रण! त्यामुळे जागतिकीकरणास त्यांचा विरोध होता. नववसाहतवादी वाढत्या विळख्याचे त्यांना भान होते. म्हणून हक्क हिरावून घेणाऱ्या खासगीकरणासही त्यांचा विरोध होता. लोकशाही जनहिताची असली पाहिजे यावर ते ठाम होते. या सर्वांचे प्रतिबिंब या वाङ्मय खंडातील सर्व लेखांमध्ये दिसून येते. 'लोकजागृती, लोकसंघटन, लोकप्रबोधन आणि लोकसंघर्ष' हे लोकशाहीतील अत्यावश्यक व अपरिहार्य घटक आहेत.' निवडणूक त्याचा मार्ग असल्याने ती निकोप वातावरणात व्हायला हवी असे प्रतिपादन त्यांनी लोकशाहीविषयक लेखांमधून केले आहे.

 कॉ. गोविंद पानसरे यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कामगार संगठन करून चळवळीद्वारे अनेक हक्क मिळवले ते जागतिकीकरणात हिरावून घेतले जात असल्याचे वैषम्य त्यांच्या मनात होते. संघटित कामगार चळवळीपुढील खासगीकरणाने उभी केलेली आव्हाने ते जाणून होते. तद्वतच असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी प्राधान्याने संगठन व चळवळ उभारली पाहिजे म्हणून त्यांचा प्रयत्न असायचा. मोलकरणी नि आशा कर्मचारी संगठन उभारून नव्या स्त्री कामगार वर्गाबद्दल ते विशेष आग्रही होते. पक्ष व संघटना यात अद्वैतता निर्माण करू इच्छिणाऱ्या या कॉम्रेडला सतत नवे प्रश्न अस्वस्थ करत. भारत प्रजासत्ताक झाल्यापासून ते कामगार चळवळ व संगठनेत सक्रिय होते. पण त्याच्यातील लेखक जागा झाला तो आणिबाणीत. नव्या शतकाचे नवे भान त्यांच्या संगठन विषयक लेखनात आहे.

 जात आणि धर्म यात त्यांनी वर्ग लढा प्रमाण मानला. जात विचार केवळ विभाजन नसते तर श्रेष्ठ/कनिष्ठ अशा उतरंडीवर तो विचार उभा असल्याने आर्थिक विकासाशिवाय विषमता व शोषणमुक्ती शक्य नाही हे ते जाणून होते. समतेसाठी उभय स्तरावर समतेची चळवळ व संगठन हाच त्यावर उपाय ते मानत. 'जातीय विषमता, वर्गीय विषमता आणि स्त्री-पुरुष विषमता या सर्व विषमतांविरुद्ध एकत्र संघर्ष करून संपवता येतील.' असा आशावाद ते आपल्या लेखांमधून व्यक्त करतात.

 जागतिकीकरणाने सामाजिक न्यायापुढे नवे प्रश्न निर्माण केले आहेत. औद्योगिक सेझने शेतकरी आत्महत्या करत आहे. भांडवलदारी व्यवस्था

वाचावे असे काही/१५०