पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/150

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कॉ. गोविंद पानसरे समग्र वाङ्मय खण्ड - २ संपा. डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. रणधीर शिंदे प्रकाशक - लोकवाङ्मय गृह, मुंबई प्रकाशन - २०१७ पृष्ठे -४००, किंमत - ४००/-



कॉ. गोविंद पानसरे समग्र वाङ्मय (खण्ड - २)

 कॉ. गोविंद पानसरे समग्र वाङ्मय खण्ड - २ चे प्रकाशन नुकतेच लोकवाङ्मय गृह, मुंबईतर्फे आदरपूर्वक करण्यात आले आहे. त्याचे संपादन डॉ. अशोक चौसाळकर व डॉ. रणधीर शिंदे यांनी केले आहे. कॉ. गोविंद पानसरे समग्र वाङ्मय खण्ड - १ चे प्रकाशन कॉ. गोविंद पानसरे यांच्या सन २०१० मध्ये संपन्न झालेल्या अमृत महोत्सवानिमित्त करण्यात आले होते. त्याचे संपादन डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले होते.

 पहिल्या खंडात कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या छोट्या-मोठ्या २२ पुस्तिकांचे संकलन आहे. तर खण्ड - २ मध्ये विविध विषयांवरील लेखांचे संकलन आहे. दुसऱ्या खंडाच्या संपादकद्वयांनी सर्व लेख वाचून त्यांची वर्गवारी आठ भागात केली आहे. पहिले सात भाग लेखांचे असून आठवा भाग तीन साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणांचा आहे. समाजवाद आणि लोकशाही, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि कामगार चळवळ, जात आणि वर्ग, जागतिकीकरण आणि सामाजिक न्याय, शिक्षण, इतिहास आणि संकीर्ण अशा वर्गवारीत विभागलेले लेख वाचत असताना लक्षात येते की हे लेखन समाज प्रबोधनाच्या तळमळीतून व ध्यासातून झाले आहे. त्या लेखांचा पाया कम्युनिस्ट विचारसरणी आहे. पण हे लेखन पठडीबद्ध नाही.

वाचावे असे काही/१४९