पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/152

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सामान्यांचे जिणे जिकिरीचे करते आहे. सहकार संपुष्टात येऊन भांडवलदार पुन्हा मालक होत आहे. शेतकरी व कामगार यांच्या मुळावर उठलेले जागतिकीकरण टोल, बीओटी, आऊट सोर्सिंग, कॉन्ट्रॅक्ट लेबर इ. माध्यमातून सामान्यांचे जगणे अशाश्वत करते आहे. हा हल्ला परतवून लावायचा तर लोकचळवळ हाच त्यावरील परिणामकारक उपाय असल्याची खात्री झाल्याने सन १९९० नंतर त्यांनी चळवळ केंद्री प्रबोधनाच्या मार्गाचे समर्थन आपल्या उत्तर कालखंडातील समग्र वाङ्मयात केलेले दिसते.

 व्यापार, उद्योग, सहकार, शेतीच नाही तर शिक्षणासही खाजगीकरणाचे ग्रहण लागले असल्याचे कॉ. गोविंद पानसरे यांनी आपल्या विविध लेखांमधून लक्षात आणून दिले आहे. शिक्षण व इतिहास यांचा मेळ घालत त्यांनी केलेले लेखन अधिक वस्तुनिष्ठ व वैज्ञानिक झाले आहे. धर्मनिरपेक्षता, बहुजनवाद, विवेकवाद इ. मूल्यांवरील त्यांची वाढती आस्था हे लेखक म्हणून कॉ. गोविंद पानसरे यांच्या विचार विकासाचे निदर्शक होय. नेत्यांना जातीय संकीर्णतेत बांधण्याच्या वाढत्या प्रवृत्तीबद्दल त्यांची विधाने व लेखन याचीच साक्ष देणारे सिद्ध होते.

 समकालीन प्रश्न, प्रसंग लक्षात घेऊन प्रतिक्रियात्मक व्यवहार व लेखन हे त्यांच्या पारदर्शी व्यक्तिमत्त्वावर मोहर उठवणाऱ्या गोष्टी होत. माहिती अधिकार, परकीय गुंतवणूक, परप्रांतीयांचा प्रश्न यावर ते कधीच बघे राहिले नाहीत. जग काही करो न करो, मी प्रक्षिप्त राहिले पाहिजे अशी धडपड या साऱ्या लेखनामागे दिसून येते. तिथे कॉ. गोविंद पानसरे व त्यांचे समग्र वाङ्मय इतरेजनांपेक्षा वेगळे सिद्ध होते.

 डॉ. अशोक चौसाळकर व डॉ. रणधीर शिंदे यांनी या खंडास लिहिलेली प्रस्तावना म्हणजे दुसऱ्या खंडाच्या विषय व आशयाची साक्षेपी उकल होय. समग्र वाङ्मय खंड, गौरविका, गौरव ग्रंथ, आरपार कॉम्रेड, कोल्हापुरातील सामाजिक व राजकीय चळवळी अशा अनेक ग्रंथ संदर्भातून उभे राहणारे कॉ. गोविंद पानसरे व्यक्तीपेक्षा विचार व व्यवस्था म्हणून समाजहितैषी गृहस्थ होते. सतत व्यवस्था व समाजाबद्दल असंतुष्ट व अस्वस्थ असणारे गोविंद पानसरे बिघडलेली घडी व्यवस्थित करू पाहणारे चळवळे कार्यकर्ते नि कळवळे साहित्यिक होते. म्हणून कॉ. गोविंद पानसरे समग्र वाङ्मय खंड - २' वाचणे म्हणजे समाज कसोटीवर स्वतःस पारखण्याचा वस्तुपाठ ठरतो. तो एकदा प्रत्येकाने करावा.

◼◼

वाचावे असे काही/१५१