पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/117

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एप्रिल, १९४५ ला हिटलरने आत्महत्या केली तेव्हा त्याच्या संग्रही एक दोन नव्हे, चांगली सोळा हजार पुस्तकं होती. दुसऱ्या महायुद्धात जर्मन पाडावानंतर दोस्त राष्ट्रातील सैनिकांनी, त्यातही विशेषतः अमेरिकन सैनिकांनी जी लूट केली त्यात हिटलरची पुस्तके मोठ्या संख्येने होती. ती आता अमेरिकेतील लायब्ररी ऑफ काँग्रेस, ब्राऊन विद्यापीठ ग्रंथालयात एकत्र करण्यात आली आहेत. त्यावर संशोधन होऊन 'हिटलर्स प्रायव्हेट लायब्ररी' सारखं पुस्तक प्रकाशित झालं आहे. ते समजून घेताना 'लीळा पुस्तकांच्या' मधून कळतं की हिटलर वाचताना खाणाखुणा करत असे. पुस्तकं संग्रहकास अमर करतात, हे जसं खरं तसं जो पुस्तकं वाचतो तोच त्याचे परिणाम जाणत असतो. म्हणून राष्ट्रप्रमुख वाचणारे हवेत. आणि वाचनातली विधायकता कृतीत आणणारेही. हे सर्व 'लीळा पुस्तकांच्या' वाचताना लक्षात येते.

 'लीळा पुस्तकांच्या' मध्ये विविध इंग्रजी पुस्तकांबद्दल २३ लेख असले, तरी ते शंभराहून अधिक ऐतिहासिक महत्त्वाच्या पुस्तकांची माहिती देते. सर्व पुस्तक संग्रह, निर्मिती, दुर्मीळता अशा अंगानी पुस्तकाचं जग समजावते. हे जरी खरं असलं, तरी या पुस्तकातला सर्वांत महत्त्वाचा लेख म्हणजे 'महाराष्ट्रीयांच्या पुस्तक संस्कृतीवर दृष्टिक्षेप'. तो सर्वांनी आवर्जून वाचलाच पाहिजे. अशासाठी की मराठी पुस्तक जगत, पुस्तक विषय, पुस्तक संग्रह, वाचन व्यवहार जगाच्या पार्श्वभूमीवर किती तोकडा आहे, याची तो जाणीव करून देतो. म्हणजे असे की जग भरारी घेत आहे नि आपण अजून रांगतपण नाही.

 एखाद्या भाषा, प्रांत, राष्ट्र याची पुस्तक संस्कृती समृद्ध आहे हे कशावरून ठरतं? तर ते तुमच्या भाषेतील पुस्तकांवर किती पुस्तके लिहिली जातात त्यावरून. पुस्तकांविषयीची पुस्तके (Books on Books) किती, कशी लिहिली जातात हे महत्त्वाचं. पुस्तक इतिहास, पुस्तक आठवणी, पुस्तक वाचक, पुस्तक संग्राहक, पुस्तक मांडणी, पुस्तक बांधणी, रचना, निर्मिती, टंक (फाँटस्), मुद्रण अशा सर्वांगी पुस्तक व्यवहारावर मराठीत अल्प पुस्तके आढळतात. मराठीत पुस्तकांविषयी लिहिले जाते ते काय वाचावे, काय वाचू नये असे सुचवणारे लेखन अधिक. स्वदोष स्वीकारून मी म्हणेन की तुम्ही आत्ता वाचता ते सदर 'वाचावे असे काही' याच पठडीतले. आपण शिक्षित होतो पण वाचनवेडे, पुस्तक संग्राहक होत नाही. शंभर वर्षांपूर्वी मराठी पुस्तकांची आवृत्ती हजाराची असणे मोठी गोष्ट

वाचावे असे काही/११६