पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/118

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मानली जायची. आज मराठी पुस्तकांची आवृत्ती पाचशेवर येऊन ठेपणे आपल्या वाचन व पुस्तक संस्कृतीचा आखडता प्रदेशच स्पष्ट करते. पश्चिम बंगालमध्ये सर्व शिक्षित घरात समग्र टागोर, समग्र शरत्चंद्र, समग्र बंकिमचंद्र साहित्य असतं. समग्र खांडेकर, कुसुमाग्रज, करंदीकर, नेमाडे हे आपले इनमीन चार ज्ञानपीठ विजेते साहित्य आपल्या घरी असते का? पुस्तकांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र घर बांधले होते हे सांगणार. नंतर किती जणांनी अशी घरे बांधली? ते जाऊ द्या - घरात पुस्तकांची संख्या अधिक की कपडे, खेळणी, दागिने, पोषाख, भांडी अधिक? थोरो नावाचा लेखक कुडकुडत्या थंडीत कोट आणायला म्हणून बाहेर पडतो. वाटेत पुस्तकाचे दुकान भेटते. थंडी विसरून तो कोटाऐवजी पुस्तके घेऊन येतो. असे आपले कधी झाले आहे का? असे अनेक प्रश्न विचारणारे हे पुस्तक वाचणे म्हणजे पुस्तकरूपी आरशात स्वतःचं सुशिक्षितपण अनुभवणे, पाहणे होय.

 लोकवाङ्मय गृहाची पुस्तक निर्मिती कशी विषयस्पर्शी असते त्याचा हे पुस्तक म्हणजे उत्कृष्ट नमुना होय. 'हरवलेल्या पुस्तकांचं पुस्तक', 'पुरातन पुस्तके', 'पुस्तकांच्या दंतकथा', 'ग्रंथालयातील मंतरलेली रात्र', 'प्राध्यापक जेव्हा पुस्तक विक्रेता बनतो', 'वाचकच कादंबरीचे पात्र बनतो तेव्हा...', 'पुस्तकचोराच्या मागावरील गुप्तहेर', 'एका शब्दकोशाची जन्मकथा', 'न वाचलेल्या पुस्तकांबद्दल', 'पुस्तकाची असोशी (तहान) ही लेख शीर्षकेच तुम्हास संपूर्ण पुस्तक वाचण्यास भाग पाडतात. पुस्तकांसबंधी या लेखांच्या प्रारंभी लेखक व पुस्तकाविषयी नितीन रिंढे यांनी जो परिचयपर मजकूर दिला आहे, तो जिज्ञासावर्धक आहे. प्रत्येक लेखातील प्रत्येक उदाहरण आपणास आपल्या वाचन दारिद्र्याची जाणीव करून देते. त्या अर्थाने 'लीळा पुस्तकांच्या' हा ग्रंथ स्वतःस सुशिक्षित समजणाऱ्या प्रत्येकाचे गर्वहरण करणारा होय.

 मी जगातील १५ देशांतील ग्रंथालये पाहिली, अनुभवली, वाचली आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपल्या ग्रंथालयांची अनास्था पाहिली की आपणास सुशिक्षित कसे म्हणायचे असा प्रश्न पडतो. डॉ. के. भोगिशयन नावाचे एक अपवाद, कुलगुरू शिवाजी विद्यापीठास लाभले. कार्यालयात पुस्तके वाचणारे ते एकमेव प्राचार्य नि कुलगुरू! शिक्षण संस्था प्रमुखांचं पुस्तक न वाचणं हे मराठी वाचन संस्कृतीचं खरं दारिद्रय होय. आता महाराष्ट्र शासन सार्वजनिक

वाचावे असे काही/११७