पान:वाचन (Vachan).pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हे अध्यापन वेळापत्रकात बसवणे अवघड. तद्वतच त्याचा ठोकताळाही असत नाही. ते सर्व विद्यार्थी व शिक्षक यांच्या समन्वित समझेवर ठरत असते. असे असले तरी त्याचे काही मूलभूत घटक वा पक्ष आहेत. त्यातून ते साधत असते.
 १) मौखिक (oral)
वाचन प्रारंभिक अवस्थेत मौखिक पद्धतीने, शक्य असल्यास ताल, नाद, संगीत, बडबडगीते इत्यादीतून देहबोली, हातभाव इत्यादीद्वारे रंजक पद्धतीने शिकवले गेले तर ते प्रभावी व परिणामकारक ठरते. तत्पूर्वी मात्र व्यक्तिगत अध्यापनावर भर देणे हिताचे (one to one teaching). मोठ्याने वाचन, उच्चारण व नंतर विद्यार्थ्यांनी अनुकरण करत हुबेहुब उच्चारण करणे (अनुउच्चारण/अनुवाचन) महत्त्वाचे. यात दुरुस्ती, सराव, घोकंपट्टीवर भर हवा. त्याच्या स्थिरीकरणासाठी दृक्श्राव्य साधने, तक्ते, ठोकळे, पत्ते, पुढे, पट्टिका (Slides) इत्यादीचा वापर रंजक, बोधगम्य तसाच कायमस्वरूपी अध्ययनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो.
२) दृष्यमानता (visual)
 आपण जे अक्षर, मूळाक्षर, शब्द शिकवणार त्याच्या उच्चारण, लेखनाच्या स्थिरीकरणासाठी तक्ते, ठोकळे, चित्रे, पुढे, पत्ते शिवाय पट्टिका, तालिका वापरणे, अन्य दृकश्राव्य साधनांचा वापर (रेडिओ, दूरदर्शन, प्रोजेक्टर इ.) हा तितकाच महत्वाचा. चित्रफिती, ध्वनिफिती, ऑनलाईन शब्दकोशांतील उच्चारण प्रात्यक्षिके सरावासाठी उपयुक्त ठरतात.
३) शाब्दिक (Verbal)
 शाब्दिक उच्चार, लेखन मौखिक आणि लिखित अध्ययन, अध्यापनाद्वारे अधिक प्रभावी होते. उच्चार स्पष्टता प्राथमिक वाचनात महत्त्वाची. -हस्व, दीर्घ उच्चाराचा सराव महत्त्वाचा. तो उच्चार नि लेखन दोन्ही स्तरावर भर देत व्हायला हवा. साऱ्या शुद्ध, अशुद्ध लेखनाचे भविष्य ठरते ते इथे. शिक्षकांनी इथे अधिक जागृत रहायला हवे. सूट, सवलत, दुर्लक्ष म्हणजे भाषेच्या आणिबाणीकडे मार्गक्रमण असते.
४) देहबोली (Body Language)

 प्राथमिक स्तरावरचे वाचन हे रंजक व्हायचे तर हावभाव, भावभंगिमा, उच्चारांचे आरोह-अवरोह इ. द्वारे अभिवाचन, अभिनय महत्वाचा. कायिक, वाचिक अभिनयातून अध्यापन म्हणजे देहबोलीचा विकास असतो. 'शहाणा' शब्दाच्या उच्चारण फरकातून अर्थभिन्नता निर्माण होते.

वाचन/९६