पान:वाचन (Vachan).pdf/96

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


तसाच शब्द आहे ‘खग'. 'ख' म्हणजे आकाश आणि 'ग' म्हणजे गमन. आकाशात भ्रमण करणारा तो पक्षी हा बोध असाच.
५) पदक्रम (Syntax)
 पदक्रम ही व्याकरण निर्धारित शब्दरचना असून ती क्रमबद्धतेतून आकाराला येत असते. वाक्य हा केवळ शब्दसमूह नसतो तर सार्थक क्रम असतो. 'मी आहे येणार उद्या' हा शब्दसमूह असला तरी ते वाक्य होऊ शकत नाही. कारण वाक्याची पूर्वअट अर्थबोध असते. 'मी उद्या येणार आहे' या शब्दसमूहातून व्यक्तीच्या आगमनाची सूचना मिळते. कर्ता, कर्म, क्रिया इ. चा वाक्यातील क्रम व्याकरण संमत असून त्यातूनच समान संवाद, संप्रेषण शक्य होते.
६) पूर्वज्ञान (Background Knowledge)
 प्राथमिक वाचन अध्यापनात नवसाक्षराचे मौखिक भाषाज्ञान गृहित आहे. बोलायला येत असलेल्याला वाचायला शिकवता येते. मुक्यास हा बोध संकेताने (sign) शिकवता येतो. नवसाक्षरांच्या पूर्वग्रहण केलेल्या मौखिक भाषिक सामुग्रीचे ज्ञान, भान शिक्षकास असणे आवश्यक. ते चाचणी, चाचपणी, निरीक्षण, संवाद, प्रश्नोत्तर इत्यादीतून लक्षात येते. त्या आधारे वाचन शिकवणे अपेक्षित आहे. मौखिकचा लिखिताशी समन्वय हे वाचनाचे सूत्र होय. क्रमात मौखिक प्रथम. कारण ते सोपे नि पूर्वग्रहित असते. लिखित सर्वथा नवसाक्षरासाठी नवे असते. शिक्षकाची खरी कसोटी तिथे असते.
५.९.२ वाचन अध्यापन पद्धती (Teaching Reading Methods)
 विद्यार्थ्यांना वाचायला शिकविण्याच्या पद्धती या व्यक्ती, इयत्ता, स्तर (प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन, विद्यापीठीय, संशोधन इ.), विषय इत्यादी आधारे भिन्न आहेत. प्राथमिक अध्यापन (Basic Teaching of Reading) बालवयात (बालवाडी, प्राथमिक शाळा इ.) वाचन शिकवीत असताना प्रत्येक विद्यार्थ्यातील क्षमता व कौशल्य फरक (Individual Differance) लक्षात घेणे महत्वाचे असते. तसेच बालवयात वाचन नाना परीने शिकवावे लागते. उदाहरणार्थ -

वाचन (Vachan).pdf
वाचन/९५