पान:वाचन (Vachan).pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ओजपूर्ण वा गतिमान वाचन (Fluent Reading) ही ताबडतोब घडून येणारी गोष्ट नव्हे. त्यासाठी सराव आवश्यक असतो. तो विविधांगी जितका होईल तितका वाचन, लेखनाचा पाया मजबूत होत असतो. त्यासाठी वाचनाचे मूलभूत घटक समजून घेणे आवश्यक असते.वाचनाचे प्राथमिक घटक पुढीलप्रमाणे आहेत १) अक्षर ओळख (Alphabet Recognition)

  वाचनाचे दोन मूळ घटक असतात- शब्दबोध नि आकलन. त्याचा प्रारंभ मूळाक्षर परिचयाने होत असतो. हे अध्यापन अंकलिपी, तक्ता, स्लाईड्स, वस्तू इत्यादीद्वारे आणि उच्चार नि लेखन (गिरवणे) माध्यमातून सुलभपणे सुगम होत असते. मूळाक्षर ओळख ही वाचनाची पहिली पायरी होय. ती सराव वा वारंवारीतेतून (Practice) विकसित होत असते. ही प्रक्रिया संयुक्त नि समान्तर घडून यावी लागते. ती कष्टसाध्य असते. शिवाय वेळखाऊ. प्रत्येक विद्याथ्र्यांची ग्रहणक्षमता त्याच्या बुद्ध्यांकावर वा आकलन क्षमतेवर अवलंबून असते. ती भिन्न व कमी-अधिक असते. त्यामुळे व्यक्तिगत लक्ष व व्यक्तिगत सराव, स्वाध्याय महत्वाचा असतो.

२. उच्चार (Fonics)

 वाचन ही लेखन, उच्चारणाची संयुक्त क्रिया असते. प्राथमिक स्तरावर आकलनापेक्षा मूळाक्षर ओळख व नोंद महत्वाची. त्यात उच्चारणाचे महत्व असाधारण असते. मुले मौखिक भाषा घेऊन बालवाडीत वा शाळेत येत असतात. ती भाषा वा कौशल्य पूर्णपणे विकसित नसते. बोबडे, तोतरे बोल, उच्चार शास्त्रशुद्ध व व्याकरणसंमत करणे हे शिक्षकाचे खरे काम असते. ते उच्चार, खोकमपट्टी, श्रवण, अनुउच्चारणातून व लेखनाला उच्चारणाची जोड देत संयुक्त आणि समांतर होत रहाण्याने अक्षर (वर्ण -स्वर, व्यंजन), शब्द (बहुवर्ण, काना, मात्रा, वेलांटी, उकार, विसर्ग इ.) वाक्य (पदक्रम) असा टप्प्याटप्प्याने घडवून, घटवून घेणे आवश्यक असते. भाषाशास्त्रानुसार ही प्राथमिक व मूलभूत गोष्ट होय. उच्चारण हा लिखिताचा ध्वनीबोध असतो. वाचन, लेखनाच्या सार्वत्रिकीकरणातून भाषा संवादाचे माध्यम बनते. कारण सर्वजण विशिष्ट अक्षर, शब्द, वाक्य यांचा विशिष्ट बोध ग्रहण करून व्यवहारात । त्याचा समान वापर, व्यवहार करत असतात. भाषा ही प्रक्रिया जशी आहे तशी ती व्यवस्थाही आहे (Process and System) हे विसरून चालणार नाही. उच्चार भेदातून वर्ण व वर्ण वैविध्यातून जीवनातील विविध वस्तू, क्रिया इ.ना विविध संकेत प्राप्त होतात.

वाचन/९३