पान:वाचन (Vachan).pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणून तो हाती येईल ते नि कधी निवडूनही, शोधून वाचत रहातो.
५.९ वाचन अध्यापन (Teaching of Reading)
  वाचन म्हणजे लिखिताचे आकलन. ही एक अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यात ज्ञान, बोध आणि विचार यांचा संयुक्त प्रभाव नि परिणाम असतो. वाचनात मुख्यत: दोन गोष्टी घडणे आवश्यक असते - १) अक्षर ओळख वा मूळाक्षर परिचय (Alphabet Recognition), २) अक्षराचे आकलन (अक्षरांचा विशिष्ट बोध), विशिष्ट उच्चार झाल्यावर विशिष्ट अक्षर/वर्ण लिहिणे ही वाचनाची पूर्वअट असते. नंतर मग अक्षर बोध होतो. म्हणजे विशिष्ट उच्चार झाल्यावर विशिष्ट मूळाक्षर लिहिणे. त्यानंतर शब्द ओळख, वर्ण, शब्द, वाक्य असा लेखन क्रम उच्चार शिकण्याबरोबर समांतर शिकत रहावा लागतो. प्राथमिक अवस्थेत वाचन अध्यापन हे अनुकरण (उच्चाराची नक्कल) आणि अनुलेखन (गिरवणे) या पद्धतीने होते पण त्यासाठी वस्तु व अक्षर, शब्द यांचे समायोजन आवश्यक असते. 'अ' अननसाचा, ‘आ' आईचा हे पहिल्यांदा समजावे लागते. म्हणजे लक्षात आणून द्यावे लागते. प्राथमिक वाचन, लेखन या हेतुतः घडवून, वदवून घ्यायच्या क्रिया होत. त्या वारंवार करून नोंदवाव्या (खरे तर गोंदवाव्या लागतात. मुलांना वा प्रौढ निरक्षरांना वाचन शिकवणे यात त्यांच्या पूर्वज्ञानाचा वापर महत्वाचा. पूर्वज्ञान आणि अनुभवास मूळाक्षर लेखन आणि उच्चारण जोडणे म्हणजे प्राथमिक वाचन अध्यापन होय.
 इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की औपचारिक वाचन शिकणारे मूल वा निरक्षर प्रौढ मौखिक भाषा अनौपचारिकरित्या त्यापूर्वी शिकलेला असतो. वाचन अध्यापन हा औपचारिक संवाद खरा. पण तत्पूर्वी बालक काही एक मौखिक शब्द संपदा, भाषा शिकलेला असतो. शिक्षकाचे कार्य पूर्वग्रहण केलेल्या मौखिक शब्द, वाक्य इ. भाषा घटकांना शास्त्रीय पद्धतीने लेखन व उच्चारण शिकवणे. हे अत्यंत संयमाचे कार्य असते. आई नि कुटुंब घटक (भाऊ, बहिण, मित्र इ.) जे अनौपचारिक व मौखिक कार्य करत असतात; त्यास लेखन, उच्चारणाची जोड देत प्राप्त ज्ञान विस्तार करणे म्हणजे वाचन विकास होय. ते कार्य वाचन अध्यापनातून शिक्षक करत असतो.
५.९.१ वाचनाचे प्राथमिक घटक (Elements of Basic Reading)

 वाचन हा साक्षरतेचा पाया होय. बालक वा नवसाक्षरास पूर्वग्रहण केलेल्या मौखिक भाषेस लेखन व उच्चारण कौशल्याची जोड देत वाचन विकसित होत असते.

वाचन/९२