पान:वाचन (Vachan).pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असे संकेत समूह, वा शब्दसंग्रह ही भाषेची खरी संपत्ती. जितका शब्दसंग्रह अधिक, तितकी भाषा समृद्ध. प्रत्येक वर्ण (स्वर, व्यंजन) वा मातृका (Alfabet Or Syllables) भिन्न होतात त्या भिन्न ध्वनी बोधातून (उच्चारण). पुढे मग त्यांना सहअस्तित्वाने (स्वर+वर्ण (एक वा अनेक) शब्दकळा प्राप्त होऊन अर्थधारणा होते. उदाहरणार्थ‘कमळ' शब्द तीन भिन्न वर्ण, लेखन व उच्चारणसमूह (संयोग) असून ते एका फुलाचे नाव आहे हा बोध होणे म्हणजे लेखनास अर्थ प्राप्त होणे. ही क्रिया वाचनातून घडत असते.
३) लिखित बोध
  लिखित हे हस्तलिखित, टंकित, मुद्रित अशा रूपात नवसाक्षरांपुढे येत असते. अंकलिपी, तक्ते, ठोकळे, चित्र, चित्रपट्टिका(Cards/slides), पाठ्यपुस्तक याद्वारे शिक्षक वा पालक अक्षर ओळख करून देतात. पूर्वी कुणीतरी लिहिल्या, छापल्या, टंकित केलेल्या सामुग्रीचे प्रतिबिंबन अनुकरण, सराव इत्यादीतून घडते. त्यामुळे ही सामुग्री बोधगम्य, शुद्ध, सुगम, आकर्षक असणे महत्त्वाचे असते. त्यात स्पष्टता, शास्त्रोक्त आकार, उकार, प्रमाणबद्धता यांचे सर्वमान्य रूप अनुसरणे महत्त्वाचे असते. ‘उ' आणि 'ड' चा फरक जितका महत्त्वाचा तितकाच तो ‘ज' आणि 'झ' चा, तसेच 'ल' आणि 'ळ'चा. 'ऋ', 'लु', 'ज'चे लेखन, उच्चारण महत्वाचे. शब्दात शुद्धता महत्वाची तसा क्रमही. 'कमल' आणि 'कमळ' यातील फरकातून एक व्यक्तिनाम होते तर दुसरे वस्तुनाम. लिखित बोधात सूक्ष्म फरक व भेदावर भर देऊन शिकवणे महत्वाचे असते. शुद्धलेखन हा भाषेच्या सार्वत्रिकीकरणाचा व समान बोधाचा पाया असतो, याचा विचार शिक्षकास पडता कामा नये. शिक्षकांना शुद्धलेखनात सवलत आणि सूट नसते. असेलच तर शिस्तबद्ध, शास्त्रोक्त अनुकरणाची अनिवार्यता.
४) शब्दार्थ (Semantics)

  शब्दार्थाचा संबंध हा शब्द आणि वाक्याशी असतो. यातून अर्थबोध शक्य होतो. त्यासाठी भाषा प्रयोजकास शब्दसंग्रह, अर्थभिन्नता, पदक्रम इ.चे ज्ञान आवश्यक असते. शब्दार्थ निर्मिती ही वर्णांना अर्थ येण्यातून येते. उदाहरणार्थ - ‘ज' म्हणजे जीवन. 'ल' म्हणजे लय. यातून समन्वय, संयोगाने ‘जल' शब्द तयार झाला. ज्यामुळे जगणे सुलभ होते असे द्रव्य म्हणजे 'जल' हे माणसाने अनुभवाने सिद्ध केलेले शब्दरूप. पारंपारिक प्रयोगातून (उपयोग) अर्थ प्राप्त झाला.

वाचन/९४