पान:वाचन (Vachan).pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०) संवेदनशीलता, परकाया प्रवेश, वस्तुनिष्ठ जीवन व्यवहार, सहअस्तित्व इ. समाजशील गुण निवृत्तींचा विकास ही सृजनशील वाचनाची फलनिष्पत्ती होय.
५.८.४ सृजनात्मक वाचनाने निर्माण होणारी कौशल्ये
 सृजनात्मक वाचनाच्या सरावाने वाचकात काही विशिष्ट कौशल्ये विकसित होतात. ती सर्वसाधारण वाचकात आढळणे दुरापास्त असते. जो सृजनात्मक वाचन करण्यात सराईत होतो, त्यात खालील कौशल्ये आढळतात -
१) आपण वाचनाने काय मिळवू शकतो ते ठरवता येते.
२) का वाचायचे ते वाचनापूर्वी निश्चित करू शकतो.
३) मुखपृष्ठ, मलपृष्ठ (blurb) वाचून पुस्तक वाचनासंबंधीचे पूर्वानुमान करू शकतो.
४) प्रस्तावना वाचून पुस्तकासंबंधी मानसिक तयारी करू शकतो. विषयवस्तुचे आकलन यामुळे सुलभ होते.
५) पुस्तकाच्या विषयवस्तुचे प्रकरणनिहाय विभाजनावर डोळे फिरवून पुस्तकाच्या मजकुराच्या दर्जाचा अंदाज येतो.
६) पुस्तकाच्या सर्वंकष दर्जाचे भान झाल्याने पुस्तक समग्र वाचायचे, निवडक वाचायचे की सोडून द्यायचे याचा आपण निर्णय करू शकतो. त्यामुळे श्रम व वेळ यांची बचत होते.
७) पुस्तकाच्या प्रभाव व परिणामांचे आकलन शक्य होते.
८) पुस्तक मजकूर, दर्जा, चित्रे, आलेख, सांख्यिकी माहिती इ. द्वारे पुस्तकाची उपयुक्तता, अनुपयुक्तता वाचनापूर्वी लक्षात येते.
९) लेखकाचा वकुब वा क्षमतेचे मूल्यमापन शक्य होते.
१०) पुस्तक हाती येताच त्याचे वाचनमूल्य, महत्व इ. चा अंदाज बांधणे शक्य होते.
५.८.५ सृजनात्मक वाचन प्रक्रिया
 सृजनात्मक वाचन प्रक्रिया तीन अवस्थांमधून विकसित होत असते -
१) विकासात्मक प्रक्रिया (Development Process)
२) आकलन प्रक्रिया (Comprehension Process)

३) ज्ञानात्मक प्रक्रिया (Cognative Process)

वाचन/८९