पान:वाचन (Vachan).pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१) विकासात्मक प्रक्रिया : ही सृजनात्मक वाचन विकासाची प्राथमिक वा सरळ प्रक्रिया होय. यात अर्थग्रहण, स्थित्यंतर, आशय, देवाणघेवाण (Interaction), इतिहास इ. घटकांचा समावेश असतो. या प्रक्रियेत अर्थग्रहणानंतर आशयाकडे वाचक वळतो. तो स्वत:शी प्रश्न करत संहिता वा पाठ्यसामुग्री (Text) समजून घेतो.
२) आकलन प्रक्रिया : अर्थ विकास झाल्यानंतर आकलन, रसग्रहण, विश्लेषण इत्यादी बाबींना महत्व येते. स्मरण, उदाहरणे, दृष्टिकोन समजून घेणे, संकल्पनांचे विश्लेषण या मार्गे वाचक लिखित सामग्री अधिक खोलात जाऊन समजून घेतो.
३) ज्ञानात्मक प्रक्रिया : व्यक्तिगत क्षमतेच्या आधारे पाठ्यसामग्री अन्वय (अर्थ नव्हे!) लावणे, संदर्भासह आशय समजून घेणे (मिथक, रुपक, अलंकारार्थ इ.), पूर्वानुभवाधारे मजकूर बोधन, मजकूर गाभा लक्षात घेणे यातून अर्थ ते आशय, वक्तव्य ते लक्षार्थ, ध्वन्यार्थ इ.चा प्रवास या प्रक्रियेत घडतो.
  या तीनही अवस्थांमधून सृजनात्मक वाचन परिपक्व, अर्थगर्भ, आशय गर्भ होत सृजनक्षम बनते. सृजनात्मक वाचन हे वाचनाच्या विविध प्रकारातील सर्वश्रेष्ठ दर्जाचे वाचन एवढ्याच करिता मानले जाते की अशा वाचनाची इति:श्री नवनिर्मिती असते. सृजनात्मक वाचनवृत्ती वाचकात (विशेषतः साहित्यिक, कलाकार, संगीतकार इ.) उपजत असते. वाचनाने त्या क्षमतेचा चरमोत्कर्ष विकास या वाचनाने शक्य होतो. सृजनात्मक वाचनाचा प्रारंभ जिज्ञासेने होतो तर त्याची फलश्रुती निर्मितीने होते. निर्मितीतून नवे सृजनात्मक वाचन जन्माला येते. या शृंखलाबद्धतेमुळे सृजनात्मक वाचन ही अखंड विकासप्रक्रियाच होय. शिक्षण घेण्याच्या काळात विद्याथ्र्यांत सृजनात्मक वाचन कौशल्याचा विकास घडेल तर ज्ञानरचनावादी शिक्षण सार्थक ठरेल. निर्मिती ही जर ज्ञानाची कसोटी मानू तर सृजनात्मक वाचन त्याचे साधन ठरेल. सृजनात्मक वाचनाचा चरमोत्कर्ष नसतो पण निरंतरता ही तिची कसोटी असते. ती जिथे थांबेल तिथे निर्मिती थांबली असे समजावे.

 साहित्यिक अनेक उद्देशांनी वाचन करीत असतो. तो निखळ आनंदासाठी वाचतो. आपले लेखन समृद्ध करण्यासाठी त्याचे औपचारिक, अनौपचारिक वाचन सुरू असते. लेखनात नव्या कल्पना, पात्रे, बीजे, विचार, शैली यावी म्हणून तो वाचत असतो.

वाचन/९०