पान:वाचन (Vachan).pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संगीत, स्वर, ताल, नाद तसेच अभिवाचन वा संवादातील आरोह-अवरोह यातून भाव प्रगटीकरण व विचारप्रभाव वर्धन शक्य होते. या सर्वांच्या एकत्रित प्रभावामुळे वाच्य सामुग्रीचे आकलन सुस्पष्ट होते. त्यातून नवबोध, नवअनुभूती हा सृजनात्मक वाचनाचा परिणाम असतो. म्हणून वाचन हे सोपाननिहाय घडले तर अपेक्षित परिणाम निर्माण होणे शक्य असते.
५.८.३ सृजनात्मक वाचनाचे फायदे
 सर्व प्रकारच्या वाचनांचा विचार करता सृजनात्मक वाचन हे प्रगल्भ होय. ते कौशल्य होय. ते प्रयत्नसाध्य असते. वाचन निरंतरता अशा वाचन विकासास आवश्यक बाब असते. चोखंदळ वाचकाचे वाचन आणि साहित्यिक वाचन यात हेतु आणि पद्धतीचा फरक असतो. त्यामुळे सृजनात्मक वाचनाचे अनेक लाभ असतात -
१) सृजनात्मक वाचनामुळे वाचकात वाचन अभिरूची विकसित होते. साहित्याप्रमाणे वाचन हे अभिजात या अंगाने विशिष्ट स्वरूप, कार्य, पद्धतीचे असते.
२) सृजनात्मक वाचन ही गंभीर व हेतुपूर्वक प्रक्रिया असल्यामुळे वाचकाच्या साहित्यिक व्यक्तिमत्वात ज्ञानसंपादन, विश्लेषण, संश्लेषणविषयक नवकौशल्य नि वृत्तींचा विकास होणे स्वाभाविक असते.
३) सृजनात्मक वाचनाचा सर्वात मोठा फायदा जर कोणता असेल तर व्यक्तीचे उदारमतवादी बनणे होय. स्वच्छंद विचारानेच ते शक्य होते. उदारमतवादी व्यक्ती म्हणजे सर्वसमावेश शक्यतांची सहिष्णूता होय.
४) सृजनात्मक वाचनामुळे गहन विचार, सर्वांगी विश्लेषण, प्रखर तार्किकता जन्माला येते.
५) प्रश्नांचा निरास होणे, शंका समाधान, जिज्ञासावर्धन हे सृजनात्मक वाचनाचे मोठे फायदे होत.
६) बहुतार्किक बुद्धिमत्ता विकास हे सृजनात्मक वाचनाचे खरे अपत्य होय.
७) एका प्रश्नाचा सर्वांगीण विचार सृजनात्मक वाचनामुळेच शक्य असतो.
८) विश्वाचे सम्यकरूपदर्शन सृजनात्मक वाचनाने संभनीय ठरते.

९) बहुआयामी कल्पनाविकास वा भविष्यलक्ष्यी स्वप्नांची वा शोधांची निर्मिती सृजनात्मक वाचनामुळे शक्य होते.

वाचन/८८