पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/३५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 १९९२ साली क्रीडावैद्यक तज्ज्ञ डॉ. राजीव शारंगपाणी व क्रीडा मानसतज्ज्ञ डॉ. पं. म. आलेगांवकर यांनी आरोग्य व स्वास्थ्य या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादात शिक्षक, पालक,मार्गदर्शक, खेळाडू व विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले.
कार्यवाही
 क्रीडामहोत्सव आयोजन करीत असताना त्यात नेमकेपणा, सुटसुटीतपणा यावा या दृष्टीने दर वर्षी १५ डिसेंबर ते २२ डिसेंबर हा कालावधी या क्रीडामहोत्सवासाठी निश्चित केलेला असतो.
 द्वितीय सत्र सुरू झाल्यानंतर प्रथम क्रीडा अध्यापकांची बैठक घेऊन खेळांची व वेळापत्रकाची निश्चिती केली जाते. त्यानंतर स्पर्धेच्या नियमांचे, वेळापत्रकाचे एक परिपत्रक काढून ते परिसरातील शाळांमध्ये पोहचविण्यात येते. दि. २५ नोव्हेंबरपासून सर्व स्पर्धाचे प्रवेश अर्ज विद्यालयात उपलब्ध करून दिले जातात. दि. ७ डिसेंबरपर्यंत आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करून स्पर्धक शाळा त्यांचे अर्ज विद्यालयात आणून देतात. सर्व अर्जाची छाननी केली जाते. यासाठी क्रीडाशिक्षक किंवा विषय शिक्षकांची सुद्धा मदत घेतली जाते. सर्व खेळांच्या भाग्यपत्रिका त्या त्या खेळाच्या स्पर्धेच्या आदल्या दिवशी तयार केल्या जातात. १९९४ सालापासून मैदानी स्पर्धासाठी खेळाडूंना क्रमांक देणे, त्यांनी संपादिलेली वेळ-अंतर इत्यादीची नोंद करणे, तसेच मैदानी स्पर्धेत प्राथमिक फे-यांमधून उपत्य व अंतिम फेरीसाठी कोणते खेळाडू निवडले आहेत याची नोंद व माहिती, त्याचप्रमाणे सर्वसाधारण नैपुण्यपदासाठी क्रमांक, विजेतेपद, उपविजेतेपद यांना गुणांकन देऊन निश्चिती करणे इत्यादीसाठी संगणकाचा वापर करण्यात येत आहे.
 क्रीडामहोत्सवासाठी आर्थिक पाठबळाचीसुद्धा नितांत आवश्यकता असते. १९९० मध्ये अनेक पुरस्कर्त्यांपैकी एक असा रोटरी क्लब-निगडी हा होता. एकूणच ज्ञान प्रबोधिनीच्या नीटनेटक्या संयोजनावर समाधान व्यक्त करून १९९१ सालापासून संपूर्ण क्रीडामहोत्सवाची आर्थिक बाजू आजपर्यंत रोटरीने सांभाळली आहे. त्यामुळे ‘ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय आयोजित व रोटरी क्लब ऑफ निगडी प्रायोजित रोटरी क्रीडामहोत्सव' असे या क्रीडास्पर्धाचे नामांतरण करण्यात आले.
 १९९३ सालापासून ‘पप्पू' हे या महोत्सवासाठी बोधचिह्न म्हणून निश्चित केले.
मैदानी स्पर्धा आयोजनासाठी संगणकाचा वापर
 शाळांच्या वाढत्या सहभागाबरोबरच स्पर्धेतील खेळाडूंची संख्या वाढली. मैदानी स्पर्धासाठी ही संख्या एक हजारच्या वर पोहोचली. या खेळाडूंचे ६६ क्रीडा प्रकार, प्रत्येकाचा ३ प्रकारांत सहभाग, या सा-यांचे नीट आयोजन करण्यासाठी संगणकाचा वापर १९९२ पासून क्रमाक्रमाने सुरू करण्यात आला.




रूप पालट शिक्षणाचे(२९)