पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हरहुन्नरी शिक्षक : वसंत पाठक

 मला नापास करणारे एकच शिक्षक भेटले, ते म्हणजे पाठक सर. त्याचं असं झालं... मी नववीत होतो. आंतरभारती विद्यालयात. नेहमी पहिल्या दोनतीन नंबरात पास होणारा मी विद्यार्थी. नववीच्या सहामाही परीक्षेत नंबरात येऊनही नापासाची नामुष्की माझ्या पदरी आलेली. हिरमुसून मी आमच्या मुख्याध्यापकांकडे गेलो. मुख्याध्यापक गोंधळी सरांना मी माझं मार्कलिस्ट दाखवलं व म्हटलं, 'वर्गात तिसरा नंबर येऊनही पाठक सरांनी मला चित्रकलेत नापास केलंय!' गोंधळी सरांनी पाठक सरांना बोलावून घेतलं, विचारणा केली व पेपर आणायला सांगितला. पेपरमध्ये तीस गुण होते. मी ग्रेस पास होतो; पण नंबर येणार नव्हता. गोंधळी सरांनी पेपर उलटून पाहिला. एका चित्रावर ते थांबले नि त्यांनी पाठक सरांना विचारले, “अहो, या मुलाने चित्र काढले आहे आणि त्याला शून्य मार्क कसे?' चित्र होतं कुलपाचं. त्याचा वरचा कोयंडा काढायला मी विसरलो होतो. कोयंड्याशिवाय कुलूप ते कसले? म्हणून पाठक सरांनी त्याला शून्य मार्क दिले होते. गोंधळी सर म्हणाले, “अहो, कोयंड्याचे मार्क कमी करा हवं तर; पण काढलेल्या कुलपाला पाच मार्क तरी द्याल की नाही? नाही! असेही तरी आपण सुवाच्च लेखनाला पाच मार्क देतोच की,' पाठक सरांनी थोड्याशा नाराजीनेच केवळ मुख्याध्यापकांचा आदर म्हणून मला कुलपापोटी पाच मार्क दिले व पास झालो नि तोही नंबरात!

 पाठक सर आज निवृत्त होताना गेल्या तीस वर्षांच्या प्रदीर्घ सहवासातील किती आठवणी आपसूकच दाटून येताहेत...

माझे सांगाती/७५