पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांचे पूर्ण नाव वसंत गोपाळ पाठक. ब्राह्मण कुटुंबात सरांचा जन्म झाला. वडिलांकडून सरांना कष्ट, प्रामाणिकपणा, प्रसिद्धीपराङ्मुखता, आदींचे संस्कार मिळाले. सरांनी ते आयुष्यभर जपले. ते मूळचे जोतिबाचे. वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने नरसोबाच्या वाडीस असताना तिथे त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांचे झाले. पुढे कुरुंदवाडच्या एस. पी. हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण, सर एस. एस. सी. नापास झाले नि त्यांनी स्वावलंबनाने शिक्षण घ्यायचं ठरवून स्वबळावर पास झाले. चार आणेवारीनं पोहण्याचे वर्ग ते चालवायचे नि शिकायचे. पुढे त्यांनी खाणावळीत दहा रुपये माहवारावर वाढप्याचे काम केले. लुकतुकेंच्याकडे पेपर टाकायचे काम केले. विकास सोप फॅक्टरीतही उमेदवारी केली. लहानपणापासूनच चित्रकला, पोहणे, बासरीवादन, शरीरसंपदा कमावणे अशा विविध छंदांनी विकसित होत गेलेलं त्यांचं व्यक्तिमत्त्व. त्याला विकासाची खरी दिशा मिळाली. ते नूतन मराठी विद्यालयमध्ये चित्रकला शिक्षक झाल्याने. जुन्या हरिहर विद्यालयात मेहंदळे सरांच्या कडक शिस्तीतही त्यांनी चित्रकला शिक्षक म्हणून काही धडे गिरविले. ए. टी. डी., एस. टी. सी., सी. पी. एड. अशा पदवीपूर्ण अध्यापन पदविका नि प्रमाणपत्रे मिळवून त्यांनी आपल्यातील शिक्षक प्रशिक्षित केला व १९६३ मध्ये ध्येयवादाने सुरू झालेल्या आंतरभारती विद्यालयात ते शिक्षक म्हणून दाखल झाले. मीही त्याच वर्षी त्या शाळेत गेलो. त्यानंतर गेल्या ३५ वर्षांत शिक्षक, सहकारी, मित्र, हितचिंतक अशा विविध रूपांत त्यांचे जे दर्शन झाले, ते मनावर ठसा उमटवून गेले. सर आम्हाला भूगोल, शारीरिक शिक्षण, चित्रकला असे विविध विषय शिकवायचे. त्यांचा भूगोल धड्यातला कधीच असायचा नाही. आम्ही आठवीनववीत असताना केनिया, झांबियासारखे आफ्रिकी देश स्वतंत्र होत होते. सर । त्यांचं रसभरीत वर्णन करायचे. कधी कात्रणं, कधी तिकिटं, नाणी यांतून त्यांचा भूगोल साकारायचा. सर त्या वेळी ‘धडपड' नावाचे भित्तिपत्रक चालवायचे. मी लेखक झालो त्यांच्या या भित्तिपत्रकातून. माझी पहिली कविता ‘धडपड'मध्ये प्रकाशित झाली होती.
 सरांच्या हातात मोठी कला असायची. शोकेस सजवणं, रोजचं आकर्षक फलकलेखन, प्रदर्शनाची मांडणी, रांगोळी, रेखाटन, बँडवादन, बासरीवादन, बहुभाषी गाणी शिकविणं यातून सरांच्यातील हरहुन्नरी शिक्षक सतत झरत असायचा सर कधी कोणावर चिडलेले आठवत नाही.
 मी त्या वेळी रिमांड होममध्ये होतो. सर प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जाऊन पालकांना भेटून प्रगतिपुस्तक देऊन प्रगती/अधोगतीची चर्चा करायचे. रिमांड होममध्ये आवर्जून येणारे तेच एकटे शिक्षक होते.


माझे सांगाती/७६