पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संचालक झालो. त्याच काळात डॉ. जयसिंगराव पवार शाह संशोधन केंद्राचे संचालक म्हणून डॉ. विलास संगवेयांच्या निवृत्तीनंतर रुजू झाले. डॉ. माणिकराव साळुखे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू असण्याच्या काळात वस्तुसंग्रहालय संकुल उभारण्याची कल्पना चर्चेत आली. त्या वेळी मराठा वस्तुसंग्रहालय, शाह संग्रहालय व खांडेकर संग्रहालयाच्या संचालकांच्या संयुक्त बैठका होत. त्यातूनही विचारांची देवघेव होत राहिली व ऋजू व्यक्ती म्हणून मी त्यांना ओळखू लागलो. संयमित संवाद, अनाग्रही मांडणी, निर्वैर मैत्री, तटस्थ पण त्रयस्थ नव्हे असे संबंध ठेवण्याची नजाकत, शाहू प्रभावामुळे खानदानी जीवनव्यवहार आणि शैली या सर्वांची भुरळ मला पडत गेली खरी; पण त्यांचे भारदस्त व्यक्तिमत्त्व हे माझ्या त्यांच्याप्रती आकर्षणाचे केंद्र होऊन गेले होते. त्या काळात ते सराफी सूट वापरत. तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वास तो शोभून दिसत असे. अलीकडे ते बुशशर्ट, पँट वापरतात. पूर्वी कोट, टायही वापरत म्हणे; पण तो त्यांचा पोशाख मी फोटोतच पाहत आलो आहे.
 त्यांचे नि माझे घरोब्याचे, निकटचे संबंध निर्माण होण्याचे आणखी एक कारण म्हणजे जयसिंगरावांची कन्या मंजूश्री व कॉ. पानसरेंची सून मेघा. जयसिंगराव व वहिनींना मंजूच्या दोन गोष्टींची चिंता असायची. एक, ती लग्न करीत नाही व दुसरी, पीएच. डी. मनावर घेत नाही. तिकडे कॉ. पानसरेंना मेघाची नोकरी कायम व्हावी म्हणून पालक म्हणून चिंता असायची. या दोघी श्रमिक प्रतिष्ठानच्या आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह मंडळाच्या कामामुळे माझ्या निकट संपर्कात आल्या. नंतर अनेक उपक्रमांत आम्ही एकत्र काम करीत राहिलो. त्यातूनही एक प्रकारचा आपलेपणा आलेला. मंजूच्या कामात मला पन्नास टक्के यश आले नि ती पीएच. डी. झाली. मेघाच्या कामात १00 टक्के यश आले. ती नोकरीत कायम झाली. त्यामुळे डॉ. जयसिंगराव पवार व कॉ. पानसरे यांच्या कुटुंबातील मी दुवा बनून गेलो.

 पुढे कॉ. पानसरेंचा अमृतमहोत्सव साजरा व्हावा असे डॉ. मंजूश्री व डॉ. मेघाला वाटत होते. त्या दोघींनी पानसरेंना भरपूर गळ घातली; पण ते दाद देईनात. मग मी नि डॉ. जयसिंगराव यांनी मिळून त्यात लक्ष घालायचं ठरवलं. प्रत्यक्ष अमृतमहोत्सव झाला त्याच्या अगोदर सुमारे वर्षभर आम्ही त्यांना काही बोलायचे म्हणून हॉटेल पर्लला संध्याकाळी आमंत्रित केले. डॉ. मंजू व डॉ. मेघाही होत्या. एक खोली बुक करून त्यांचा अमृतमहोत्सवी सत्कार केला नि समारंभाचे महत्त्व व गांभीर्य पटवून दिले. ते त्यांनी सशर्त मान्य केले. 'आधी लगीन कोंढाण्याचे' या न्यायाने पक्ष कार्यकर्त्यांची चरित्रे प्रकाशित केल्यानंतर

माझे सांगाती/६४