पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शाहूप्रेमी इतिहासकार : डॉ. जयसिंगराव पवार

 मला ‘सुनीलकुमार' म्हणून हाक मारणारी जी अपवाद म्हणून वडील माणसं आहेत, त्यांपैकी डॉ. जयसिंगराव पवार एक होत. मला आठवते त्याप्रमाणे त्यांचा नि माझा परिचय आम्हा दोघांचे समान मित्र असलेल्या प्रा. डॉ. ए. एन. मुतालिक यांच्यामुळे घडून आला. डॉ. मुतालिक व डॉ. पवार दोघे शहाजी महाविद्यालयात होते. मी शेजारच्या महावीर महाविद्यालयात होतो. काही कामानिमित्ताने शहाजी कॉलेजमध्ये गेलो असताना त्यांचा परिचय डॉ. मुतालिक यांनी करून दिला, तरी सरांना मी इतिहासाचे ख्यातनाम प्राध्यापक म्हणून ओळखत होतो. नंतरच्या काळात पीएच.डी. झाल्यावर मला लेखक होण्याची स्वप्ने पडू लागली. त्या काळात शैक्षणिक विश्वात डॉ. विलास संगवे, डॉ. जयसिंगराव पवार, प्रा. कांती भाई ठक्कर, प्रा. मोहन सराफ, प्रा. एम. जी. पातकर, प्रभृती प्राध्यापक क्रमिक पुस्तके लिहिणारे स्थानिक लेखक म्हणून त्यांचा दबदबा होता. जयसिंगरावांना पण मी त्या दबदब्यापोटी दुरूनच पाहत राहायचो. पुढे मी अजब प्रकाशनाचा लेखक झालो. तेही त्या प्रकाशनाचे लेखक असल्याने अनिल मेहतांकडे माझे जाणेयेणे होऊ लागले नि परिचय दृढ झाला.

 पण ते माझे मित्र होण्याचा, सुहृद होण्याचा काळ मात्र अलीकडचा नि त्याचे कारण होते कॉम्रेड गोविंदराव पानसरे, कॉ. पानसरेंबरोबर वेगवेगळ्या कारणांनी जयसिंगरावांच्या घरी जाणे-येणे घडू लागले. मी शिवाजी विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालयाचे कार्य सन २००२ पासून पाहू लागलो. पुढे

माझे सांगाती/६३