पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भेटणाच्या प्रत्येक व्यक्तीस आपल्याला यशवंतरावमय बनण्याचीच त्यांची किमया नि प्रचिती दिसते. ज्या अकृत्रिमपणे नि भक्तिभावाने ते सारं दाखवतात, देतात नि सांगत असतात, त्यातून त्यांनी संगतीत कमावलेलं पाथेय मूठमूठभर वाहत असल्याची प्रचिती येते. ही भिक्षा न आटणा-या झप्याप्रमाणे अखंड अन्नछत्र म्हणून सर्वांना मिळत राहते, तरी पुरून उरतेच.
 यशवंतराव चव्हाण यांना बाळनाथ बुवांच्या मठात कळंबे गुरुजींचं सान्निध्य लाभलं आणि सत्शीलतेची पायाभरणी झाली. हा सहवास यशवंतरावांचे बंधू गणपतराव चव्हाण यांनाही लाभल्याचं सांगितलं जातं. आदरणीय यशवंतराव चव्हाण कराडच्या ज्या शुक्रवार पेठेत संस्कारित होत वाढले, त्याच वातावरणात आणि परिसरामध्ये मोहनराव डकरे लहानाचे मोठे झाले. परिसासंगे सोने म्हणा अथवा मातीसंगे सुगंध; मोहनरावांचं कळतं वय सेवादलाच्या संस्कारांनी ध्येयवादी झालं. राष्ट्रीय विचारांचं बाळकडू त्यांना इथंच लाभलं नि आयुष्य उज्ज्वल झालं. त्यांच्या बुद्धिमत्तेची चुणूक त्यांनी इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सन १९४८ मध्ये सातारा जिल्ह्यात तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण होऊन दाखविली होती. या निमित्ताने त्यांना यशवंतराव चव्हाण यांच्या प्रथम सदिच्छा लाभल्या. सदिच्छांचं हे छत्र त्यांना आयुष्यभर लाभलं.
 मोहनराव डकरे सन १९५१ मध्ये सातवी परीक्षा उत्तीर्ण झाले. सन १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुका यशवंतराव चव्हाण यांनी जिंकल्या होत्या; पण भारताच्या स्वातंत्र्यानंतरची पहिली निवडणूक म्हणून तिचं महत्त्व होतं. पोरवयातील मोहनराव स्वकीय बांधवांच्या विरुद्ध भूमिका घेऊन यशवंतरावांच्या पाठीशी उभे राहिले. या निवडणुकीत यशवंतराव अल्पमताने निवडून आले; पण त्या अल्पमतीतील सिंहाचा वाटा मोहनरावांच्या निष्ठापूर्ण प्रचाराचा होता. त्यांची ओळख ती काय एका कार्यकर्त्यांची... अनेकांतला एक इतकीच; पण व्यवच्छेदकता होती ती निष्ठा आणि भक्तीची! त्या कसोटीवर मोहनराव ‘एकमेवादित्य'च होते. शाळकरी वयात वृत्तपत्रे टाकून त्यांनी आपल्या शिक्षणाची पायवाट मळली. या वाटेवर वि. स. खांडेकर, ह. ना. आपटे, नाथ माधव, प्रभृतींचं साहित्य भेटलं. त्यांच्या मनाची सामाजिक मशागत झाली. ते सन १९५५ ला मॅट्रिक झाले. एक हशार विद्यार्थी म्हणून महाविद्यालयीन शिक्षणाचा ध्यास लागणं स्वाभाविकच म्हणावं लागेल.

 पण घरची बिकट आर्थिक परिस्थिती अशी होती की, शिक्षणाच्या स्वप्नाऐवजी त्यांना रोजंदारीवर खपायचं सत्य सहन करावं लागलं. प्रतिकूल परिस्थिती माणसास जिद्द देते, हे मोहनरावांना एव्हाना कळून चुकलं होतं. त्यांनी हिंमत न हरता संघर्ष सुरू ठेवला. ते शिक्षक झाले; पण शिक्षणाची

माझे सांगाती/४४