पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यशवंत वारसासंवर्धक : मोहनराव डकरे

 महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री नामदार यशवंतराव चव्हाण साहेब नेता, संघटक, राजकारणी म्हणून सर्वपरिचित आहेत; पण त्यांची खरी ओळख समाजशील, मनुष्यसंग्रही व सुसंस्कृत माणूस म्हणून अधिक गडद आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वक्ता, वाचक, साहित्यिक, आस्वादक म्हणून लाभलेली किनार, झालर त्यांच्या जीवन, कार्य, विचारांना अशा उंचीवर नेऊन ठेवते की, मग अन्यांना ती आपला पाईक, चाहता, भक्त, कार्यकर्ता, अनुयायी बनवून त्यांचंही जीवन आपणासारखं करून टाकते. ‘आपणा सारिखे करूनि सोडावे सकळजन' ही संतोक्ती ज्याच्या जीवनावर सावली म्हणून राहिली, असे मोहनराव डकरे मला पहिल्यांदा भेटले ते कराड नगर परिषदेच्या व्याख्यानमालेच्या निमित्ताने. ते कराडच्या यशवंतराव प्रतिष्ठान विभागीय केंद्राचे सचिव व सौ. वेणूताई स्मारकाचे व्यवस्थापक म्हणून त्यांची झालेली माझी पहिली ओळख मला बरंच सांगून गेली.
 यशवंतराव चव्हाण यांना आराध्य मानणाच्या लोकांची संख्या महाराष्ट्रात कमी नाही; पण निरपेक्ष भक्ती, लाभाविण प्रीती करणारी माणसं विरळ अशा विरळ नि अपवाद असणाच्या माणसांत वरच्या क्रमांकावर नाव घ्यावं लागेल ते मोहनराव डकरे यांचं. मी असं का म्हणतो त्यामागे माझं स्वत:चं असं निरीक्षण आहे. त्यांनी विरंगुळा' नि सौ. वेणूताई चव्हाण स्मारक सभागृहातील वारसा ज्या आत्मीयतेने जपला आहे, त्यास तोड नाही. हे कार्य ते नोकरी न मानता चाकरी म्हणून करतात. चाकरी केवळ स्वामिनिष्ठेनेच शक्य असते. ते


माझे सांगाती/४३