पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महत्त्वाकांक्षा काही त्यांनी सोडलेली नव्हती. सन १९६० मध्ये भिवंडी येथे त्यांची यशवंतराव चव्हाणांशी गाठभेट झाली नि मोहनरावांचा शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला. ते कराडमध्ये सन १९६१ मध्ये एस.टी.सी. झाले. त्या पदवीमुळे प्राथमिक शाळेपेक्षा वरच्या पातळीवर म्हणजे माध्यमिक शाळेत ते शिक्षक झाले. माध्यमिक शाळा शिक्षक म्हणून त्यांनी ओगलेवाडीजवळील सदाशिवगडमध्ये सन १९६१ ते १९६४ पर्यंत नोकरी केली. नंतर ते दोन वर्षे वहागावाला होते. सन १९६६ पासून ते आटकेच्या माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक झाले. नोकरीतही त्यांचा आलेख सतत चढताच राहिला.
 त्या काळात लोकवर्गणीतून शाळेसाठी तीन मजली इमारत उभारून त्यांनी आपला वेगळा ठसा जनमानसात उमटविला. मा. नामदार शरद पवार यांच्या हस्ते त्या इमारतीचा लोकार्पण सोहळा १९९० मध्ये मोठ्या जनसहभागाने व जनता जनार्दनाच्या साक्षीने मोठ्या उत्साहात, दिमाखाने संपन्न झाला. त्यातून ग्रामीण शिक्षण निरंतर होण्यास मोठे साहाय्य झाले. ते कायमस्वरूपी पुढे ते बहि:स्थ परीक्षा देत, बी. ए. झाले. शिक्षक म्हणून स्वतः ते विकसित होत राहिले. जीवनाच्या प्रत्येक वळणावर मोहनराव स्वत:स गुणवत्तेच्या कसोटीवर खरे उतरवीत राहिले. त्यातून शिक्षक म्हणून जनमानसात असलेली त्यांची प्रतिमा सतत उंचावत नि विकसित होत राहिली.
 मोहनराव डकरे यांचे शैक्षणिक योगदान लक्षात घेऊन सन १९९० ला त्यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार' देऊन महाराष्ट्र शासनाने गौरविलेच; शिवाय महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती करून त्यांचा बहमानही केला. सन १९९५ ला ते सेवेतून निवृत्त झाले; पण तत्पूर्वी विविध संस्था, संघटना, विद्यार्थी यांनी त्यांचा गौरव करून त्यांच्या कार्य व समर्पणाप्रती कृतज्ञताभाव व्यक्त केला.

 त्यांच्या सेवाकाळात मोहनराव डकरे यांना यशवंतराव चव्हाण यांचा वेळोवेळी सहवास लाभत गेला. कधी सहल, कधी निवास यांतून आतिथ्यही लाभलं. ही जवळीक, आत्मीयता मोहनरावांना वेळोवेळी सुखावत तर राहिलीच पण त्यातून मोहनरावांच्या मनातील यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दलचा आदर द्विगुणित व दृढमूल होत राहिला. या सर्वांतून जगण्याचा आनंद कलेकलेने वाढत असतानाच त्यांच्या धर्मपत्नीस कॅन्सर झाला नि त्यात ती दगावली. मोहनरावांना कोडाचा विकार जडला. हृदयविकाराचा झटका खावा लागला; पण मोहनराव डकरे हे जीवनाच्या प्रत्येक सत्त्वपरीक्षेत पुरून उरले. त्यात त्यांची विजिगीषू वृत्ती दिसून येते. आज ते सान्याला मागे सारत मुले, सुना, नातवंडे यांत वानप्रस्थ सुख अनुभवत आहेत.

माझे सांगाती/४५