पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जनसामान्यांचे कैवारी : केशवराव जगदाळे

 कोल्हापूरच्या स्वातंत्र्योत्तरकालीन राजकीय आणि सामाजिक चळवळीचा इतिहास शेतकरी कामगार पक्ष, प्रजा परिषद, राष्ट्रसेवा दल, तालीम संघ यांनी घडविला. सन १९५९ ला मी कोल्हापुरात आलो, त्या वेळी माझे वय अवघे दहा वर्षांचे होते. मी जाणता होईपर्यंत माझे वास्तव्य मंगळवार पेठेत असायचे. या काळात मी अनुभवले आहे की, कोल्हापूरच्या सन १९६० च्या घडामोडींचे केंद्र मंगळवार पेठ, शिवाजी पेठ हेच होते. कोल्हापूर गाव होतं. पेठेची संस्कृती हीच कोल्हापूरची ओळख होती. या पेठांतील अनेकांच्या शहरालगत जमिनी होत्या. घरपती गाई, म्हशी, कोंबड्या असत. टेंबलाई जत्रा, गणपती, जोतिबा यात्रा सार्वजनिक रूपात साजच्या होत. शहरावर शेतकरी कामगार पक्षाचा पगडा होता. कोल्हापूरकरांचं शेतकरी असणं हेच त्याचं प्रमुख कारण होतं. शिवाजी उद्यमनगरचा विकास झाला नि शेतकरी कामगार बनला. या शेतकरी कामगार पक्षाचे त्या वेळचे पुढारी भाई माधवराव बागल, केशवराव जगदाळे, एम. के. जाधव, आ. ग. मोहिते. तिकडे समाजवादी पक्षाचे रवींद्र सबनीस, काँग्रेसचे श्रीपतराव बोंद्रे, सामाजिक कार्यकर्ते मामासाहेब मिणचेकर, पी. बी. साळुखे, व्ही. टी. पाटील ही मंडळी विविध संस्थांचे नेतृत्व करायची. मी आर्य समाजाच्या शाहू दयानंद मोफत मराठी शाळेत शिकत होतो. आमच्या शाळेचं मैदान श्रमदानातून आकार घेत होतं. त्या वेळी नगराध्यक्ष असलेले केशवराव जगदाळे आमच्याबरोबर घाम मुरेपर्यंत पहार, टिकाव, फावडे, पाटी घेऊन राबत असत. विजार, शर्ट असा

माझे सांगाती/३४