पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मोहनराव हे तसे दानी गृहस्थ, त्यांचं दान नेहमी सत्पात्री होत राहिलं आहे. राष्ट्रसेवा दल, साधना, आंतरभारती, सारस्वत समाज यांसाठी त्यांनी दिलेलं दान नेहमी झाकली मूठ राहिली आहे. या हाताचं दान त्या हाताला कळू न देण्याचा अप्रसिद्धपणा मोहनराव आजीवन जपत आहेत. हा दातृत्वाचा वसा त्यांना त्यांच्या आईकडून मिळाला. फार कमी माणसं असा वारसा नि वसा जपतात. मोहनराव त्यांतील एक होत.
 कुणाचं ऋण वागवायचं नाही, ही मोहनरावांची स्वाभाविक वृत्ती. कुणी आपणाला दहा दिले तर त्याला शतपटीन, हरत-हेनं परत करायचा रिवाज मोहनराव नेहमी पाळत आलेत. ते जे काही करतात ते भूमिगतपणे. प्रसिद्धी, पुढे-पुढे करणे यांत मोहनरावांनी कधीच स्वारस्य दाखवल्याचं आठवत नाही. त्यांना जीवनात जी पदं लाभली ती त्यांच्या सद्गुणांवर. पद मिरविण्याची त्यांची वृत्ती मला कधी दिसली नाही. अनेकदा पदांमुळे ओशाळलेले, संकोचलेले मोहनरावच मी अनुभवले. झाकलं माणिक' म्हणून राहण्याचा त्यांचा जीवनकल त्यांना सतत पद नि प्रतिष्ठा देत आला आहे.
 अशा मोहनरावांच्या नावे सारस्वत समाज वसतिगृहाच्या एका विभागाचे नामकरण होणं याला एक वेगळं सामाजिक मूल्य आहे. त्यामुळे समाजापुढे त्यांचे कार्य, कर्तृत्व, व्यक्तिमत्त्व सतत राहिलं. नव्या पिढीपुढे आज अनुकरणीय माणसं अपवादाने दिसतात. त्यात मोहनरावांचं कार्य ठळकपणे सत्शील आचरणाचा संस्कार देत राहील. कार्यकर्त्यांपुढे मोहनरावांचे नाव प्रेरणा म्हणून क्रियाशील असेल, असा विश्वास वाटतो.

 मोहनरावांना दीर्घायुष्य लाभावं ही माझी औपचारिक भावना, प्रार्थना नाही. त्यामागे समाजभल्याचा भाव आहे. अशी माणसं जितक्या अधिक संख्येने नि अधिक काळ समाजात राहतील समाज तितका वेळ निकोप राहील. आज समाजात सर्वत्र स्वार्थाचा रौरव माजला असताना मोहनराव लाटकरांचा होणारा गौरव एक नवा वस्तुपाठ कायम करील. मोहनराव लाटकर ‘सारस्वतभूषण' झाले ते त्यांच्या अंगभूत गुणवैशिष्ट्यांमुळे. ते माझ्या दृष्टीने खरे तर ‘भारतभूषण' होत. भारतीय संस्कृतीचा संयम, त्याग, क्षमा, कर्मशीलता व निष्ठा या सर्वांचा समागम, संगम म्हणजे मोहनराव लाटकर!

माझे सांगाती/३३