पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/36

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


साधा पोशाख, हातात पांढरा शुभ्र टर्किश नॅपकीन ही त्यांची ओळखीची खूण. ‘के. ब.' या नावानेच ते परिचित. नगराध्यक्षाची नुकतीच गाडी आलेली. ती असताना घरून नगरपालिकेत सायकलने जाणारे के. ब. जगदाळे. कोल्हापूरच्या सर्व सार्वजनिक उपक्रमांत राबणारा कार्यकर्ता म्हणून सर्वसंचारी असलेले. के. ब. जगदाळे यांना माझ्या बालपणापासून उमेदी नि उमेदवारीच्या काळापर्यंत मी जवळून पाहिलं आहे.
 त्यांचा मुलगा संभाजी आमच्याच शाळेत पण मागच्या वर्गात होता. आता तो कार्यकर्ता झाला आहे, ते वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवतच. केशवराव जगदाळे यांचा जन्म १० फेब्रुवारी, १९१६ रोजी शेतकरी कुटुंबात झाला. कळंबा, कात्यायनी परिसरात बहुधा त्यांची शेती होती. ते फारसे शिकले नाहीत. शेती करत जोडधंदा म्हणून ते घरी शिंपीकाम करीत. राजवाड्यातील दरबारी माणसांची शिवण ते करीत. राजाराम महाराजांचे पोशाख त्यांनी शिवले होते.

 तरुणपणात त्यांनी “भारत छोडो' आंदोलनात भाग घेतला. राष्ट्रसेवा दलाचे स्वयंसेवक, सैनिक म्हणून त्यांच्या सामाजिक व्यक्तिमत्त्वाची घडण झाली. एम. एम. जोशी, ना. ग. गोरे यांचा आरंभी त्यांच्यावर पगडा होता. नंतर भाई केशवराव जेधे, तुळसीदास जाधव, उद्धवराव पाटील, भाऊसाहेब राऊत, बा. न. राजहंस प्रभृतींचा सहवास व साहसाने आकर्षित होऊन ते शेतकरी कामगार पक्षाकडे ओढले गेले. बेचाळीसाच्या लढ्यात ते सक्रिय सहभागी झाले तेव्हा ते १८ वर्षांचे तरुण होते. मोर्चे, सभा, धरणे, पिकेटिंगमध्ये ते नुसते सहभागीच नसत, तर आघाडीवर असायचे. १९४२ च्या लढ्यात भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली जी प्रजा परिषद झाली, त्यात दहा हजारांपेक्षा अधिक तरुण सहभागी झाले होते. गोळीबार, गिरफ्तारी, धरपकड यांच्यातून तावून-सुलाखून त्यांच्यातील कार्यकर्ता घडला. सन १९४४ साली तालीम संघाची स्थापना झाली, त्या वेळच्या संस्थापक-सदस्यंपैकी एक केशवराव जगदाळे होते. डी. एस. खांडेकर (वकील), अण्णाप्पा पाडळकर, हिंदुराव मोहिते इत्यादी मंडळींबरोबर केशवराव जगदाळे सक्रिय होते. तालीम संघाची स्थापनाच मुळात स्वातंत्र्यलढ्यात तरुणांचा सहभाग वाढविण्याच्या इराद्याने झाली होती, हे फार कमी लोकांना माहीत असावं. लढ्यात स्त्रियांनी भाग घ्यावा म्हणून झालेल्या प्रयत्नांतून त्या वेळी विमलाबाई बागल, शकुंतलाबाई पाटील, ऊर्मिलाकाकी सबनीस, सुशीलाबाई पाटील, लीलाताई पाटील, लीलाबाई पवार, प्रभृती कार्यकर्त्या पुढे आल्या.

माझे सांगाती/३५