पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुढे योगायोगाने मी ‘आंतरभारती'मध्ये शिक्षक झालो. ते विश्वस्त, खजिनदार व मी शिक्षक. नंतर मी शिक्षक प्रतिनिधी म्हणून अनेक वर्षे त्यांच्याबरोबर मी एकत्र काम केलं. त्या काळात माझ्या लक्षात आलेले मोहनराव म्हणजे संस्थानिष्ठ कार्यकर्ता. मोहनराव एखाद्या संस्थेत काम करतात तेव्हा ते पूर्णपणे त्या संस्थेचे असतात. संस्थेचं सारं संयमानं सहन करण्याची पराकोटीची सहनशीलता हे मोहनरावांच्या जीवनाचं एक आगळं रसायन. त्यांच्या या स्वभावाचा लाभ अनेक कार्यकर्त्यांना ढालीसारखा, कवचकुंडलासारखा झाल्याचं मी पाहिलं आहे. मोहनरावांची ही संस्थानिष्ठा, व्यक्तिनिष्ठा नेहमीच अढळ नि अटळ राहिली आहे. त्यांच्या या निष्ठेचा फायदा अनेक संस्थांना स्थैर्य देऊन गेला. मोहनरावांसारख्या माणसात असलेली सचोटी, प्रामाणिकपणा, नैतिकता ही नेहमीच उच्च कोटीची राहिली आहे. त्यामुळे ज्या संस्थांत ते असतात, त्यांची भरभराट ठरलेली असते.
 मोहनराव म्हणजे एक अबोल, मितभाषी, ऋजू व्यक्तिमत्त्व. सभ्यता व समन्वय शिकावा मोहनरावांकडून. एकदा ते ज्या व्यक्तीला आपलं मानतात तेव्हा ते व्यक्तींच्या गुणदोषांसह तिला स्वीकारतात. आपलं मानलेल्या व्यक्ती संस्थेच्या जीवनात जेव्हा संकटं, वादळे, मतभेद निर्माण करतात तेव्हा मोहनराव खंबीर असतात. दुस-याबद्दल वाईट बोलताना मी मोहनरावांना कधी ऐकलं नाही.
 पुढे माझे स्नेही व सहकारी के. डी. कामत यांच्याबरोबर मी मोहनरावांना सारस्वत बोर्डिंगमध्ये काम करताना पाहिलं त्या वेळी हाच अनुभव. सारस्वत समाजाच्या उत्थानासाठी मोहनरावांच्या कुटुंबीयांनी परंपरेने एक मोठी त्यागाची, दानाची, वहिवाट निर्माण केली. आपली आई, ते स्वतः, त्यांच्या दिवंगत पत्नी, जावई, सारं कुटुंब नेहमी सारस्वत समाजकार्यात सक्रिय सहभागी असतं. मध्यंतरी सारस्वत बोर्डिंगच्या भाडेवाढीप्रसंगी उपोषणाचा प्रसंग आला तर मोहनरावांच्या पत्नी ज्या भीष्मप्रतिज्ञेने उपोषणात सहभागी झाल्या होत्या, ते पाहिलं की लक्षात येतं, त्या सर्वांमागे मोहनरावांचा संस्कार दडलेला होता.

 मोहनरावांचा अबोलपणा इतक्या टोकाचा की, ते स्वत:बद्दल कधीच कुणाशी काही बोलत नाहीत. कौटुंबिक पातळीवर मोहनरावांनी जे भोगलं, सोसलं त्याला तोड नाही. त्यांची स्थिती नेहमीच सँडवीचसारखी होत राहिली आहे. बाहेर आणि घरात सतत ते सोसत आले, राहिले; त्यामुळे त्यांच्या जीवनाला एखाद्या आधारवडासारखा वडीलपणा नेहमीच दिसत आला आहे.

माझे सांगाती/३२