पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/32

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


समाजशील कार्यकर्ते : मोहनराव लाटकर

माझे सांगाती (Maze sangati).pdf

 मोहनराव लाटकरना मी माझ्या विद्यार्थी दशेपासून पाहात आलो आहे. सन १९६३ ची गोष्ट असावी. कोल्हापुरातील राष्ट्र सेवादल, समाजवादी विचाराने प्रेरित झालेल्या काही ध्येयवादी मंडळींनी आंतरभारती शिक्षण मंडळाची स्थापना केली होती. मी तिथे इयत्ता आठवीमध्ये प्रवेश घेतला होता. तेव्हा मी रिमांड होममध्ये होतो. आमचे तेथील सचिव प्रा. दादासाहेब चव्हाण यांचे स्नेही व सहकारी म्हणून सर्वप्रथम मी मोहनरावांना पाहिले.

 आंतरभारती विद्यालयास त्या वेळी शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांनी भेट दिली होती. त्यांच्यासाठी शाळेने चहापान योजले होते. त्याची सर्व व्यवस्था मोहनरावांच्याकडे होती. चहापान आवरले नि मोहनराव आमच्याकडे आले. 'चला रे बाळांनो, तुम्हीपण खाऊन घ्या.' म्हणणाच्या मोहनरावांमध्ये मला त्या वेळी एका सालस, मातृहृदयी पालकाचे दर्शन झाले. मी आयुष्यात पहिल्यांदा वेफर्स खाल्ले ते मोहनरावांनी प्रेमाने दिलेल्या, खाऊ घातलेल्या त्या फराळाच्या वेळी. इतरही अनेक कार्यक्रमांत त्या काळात मी मोहनरावांना अनुभवलं. ते अबोल परंतु क्रियाशील कार्यकर्ता म्हणून मोठे होते. सतत पडद्यामागं राहायचं, चांगलं घडावं म्हणून आपलं नैतिक बळ सतत सकारात्मक वृत्तीनं देत राहायचं, ही यांची उपजत वृत्ती मी विद्यार्थिदशेपासून अनुभवत आलो आहे.

माझे सांगाती/३१