पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जगण्याचा उपदेशित आदर्श : प्राचार्य अमरसिंह राणे

 विद्यार्थिजीवनात शिक्षणाचे महत्त्व असाधारण असतं. त्यातही जो विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीत शिकत असतो, तेव्हा त्याला समजून घेणाच्या शिक्षकाची मोठी गरज असते. मला आठवतं की, मी इयत्ता नववीमध्ये आंतरभारती विद्यालय, कोल्हापूर येथे शिकत होतो. आमची सहल किर्लोस्करवाडी, ओगलेवाडी इथे जायची होती. सन १९६४-६५ ची गोष्ट. सहलीची फी होती. पाच रुपये. वरखर्च पाच रुपये. वर्गात शिक्षकांनी ‘कोण कोण येणार सहलीला' म्हटल्यावर सर्वांनी हात वर केले. वर्गात हात वर न करणारा मी एकटा. सर म्हणाले, 'अरे, तू का नाही?' मी म्हटलं, 'पैसे नाहीत. सर म्हणाले, “अरे, अशी संधी परत येणार नाही. मी फी भरतो. आपण सगळ्यांनी मिळून जायचं. आम्ही सहलीला जाऊन आलो. पुढे मी शिक्षक झालो. मला पावला-पावलाला मदत करणारे शिक्षक आयुष्यात लाभले. त्याची उतराई मी माझ्या विद्यार्थ्यांत करीत राहिलो. प्रा. विठ्ठल बन्ने, शेखर कासार, प्राचार्य अमरसिंह राणे, प्राचार्य बी. एम. चांडके असे काही शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य माझ्या जीवनात आले की, मी त्यांच्या पावलांवर पावले ठेवत मीही शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य झालो.

 मी एस. एस. सी. परीक्षा पास झालो. बरोबरची मुले कॉलेजला प्रवेश घेती झाली. मलाही कॉलेजला जायचं होतं; पण तशी परिस्थिती नव्हती. त्या वेळी आजच्याइतकं कॉलेज महाग नव्हतं. तरी जो काही खर्च यायचा तो देणंही मुश्किल होतं. म्हणून मी आय. टी. आय.ला प्रवेशाचा प्रयत्न केला. त्या

माझे सांगाती/२६