पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पणाला लावल्याचं आठवतं व त्याचे एक सार्थ समाधानही माझ्या मनात आहे. विधी महाविद्यालयात पाच वर्षांचा नवा अभ्यासक्रम सुरू करण्यास माझा आग्रह होता व त्याप्रमाणे मी शिवाजी विद्यापीठात तो अभ्यासक्रमास सुरू करण्याची मंजुरी प्राप्त केली.
 आपण जे समाजकार्य करत आलात, त्यातलं कडू-गोड काही आठवतं?
 कडू फारसं नाहीच म्हणा ना. गोड असं नाही; पण समाधान देणारं भरपूर आहे. मी शैक्षणिक, सामाजिक कामं गेली तीन दशके करीत आलो. त्यात श्री. आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळ, विक्रम एज्युकेशन सोसायटी, रुईकर धर्मशाळा, दिगंबर जैन बोर्डिंग, मराठी मुलांची शाळा, हुन्नरगी, श्रमिक प्रतिष्ठान, शिवाजी विद्यापीठ, भगवान महावीर अध्यासन अशी अनेक कामं सांगता येतील. सगळीकडे आपल्यामुळे काही हातभार लागला, याचं समाधान मोठं आहे. काही संस्थांच्या ऊर्जितावस्थेस आपण कारण ठरल्याचं समाधान मोठे आहे. विशेषत: श्री. आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक संस्थेच्या सर्व शाखांचा चहुमुखी विकास, लौकिक वृद्धी व प्राप्त प्रतिष्ठा यांत मी निमित्त झालो, हे खरं असलं तरी सहकारी संचालकांचं पाठबळ, शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी यांचा सेवाभाव यामुळेच हे शक्य झालं. या संस्थेत मी सन १९८९ ला आलो. तेव्हाचं चित्र नि आजचं, यांत जमीन-अस्मानाचा फरक पाहून खरंच वाटत नाही की, तो भूतकाळ याच संस्थेचा होता.
  शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून झालेलं कार्यही असंच स्मरणीय. श्रमिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी दारूबंदीच्या लढ्यात काही योगदान देऊ शकलो. त्याचा आनंद केवळ अविस्मरणीय! आपले व्यावसायिक कौशल्य पणाला लावून मी संस्थेच्या वास्तुंमध्ये असलेल्या ११ कुळासंदर्भात सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन तो परिसर कज्जामुक्त व संस्था कर्जमुक्त करू शकलो, यासारखं दुसरं समाधान गाठीशी असणं यात मी जीवनाची कृतार्थता मानतो.
 कुटुंब आणि समाज दोन्ही पातळ्यांवर सुखसमाधान हाच खरा सहस्त्रदर्शन योग नाही का?

 होय! पण तो आपोआप नाही येत. तुम्ही सतत निरपेक्ष, मूल्याधारित काम करीत राहा. तुम्हाला सुखाच्या मृगजळामागे धावावं लागणार नाही. उलटपक्षी, सुखच तुमचा पाठलाग करीत राहील. सुखासाठी जे पाठ लावत नसतात, तेच नवा विधायक बदल करण्यास कारणीभूत ठरतात. कारण हे कार्य नसतं, संचित नसतं, असतं ते एक निरपेक्ष निमित्त!

माझे सांगाती/२५