पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/28

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


वेळी आय. टी. आय.ला शारीरिक परीक्षा असायची. घण उचल, रोलर हलव, तरफ ढकल असं काहीबाही असायचं. मी काडी पैलवान असल्याने अर्थातच नापास झालो. एव्हाना ऑगस्ट उलटलेला. कॉलेज प्रवेश बंद झालेले. त्या वेळी मौनी विद्यापीठाची जाहिरात वाचनात आली. ग्रामीण विद्यापीठातील ग्रामभारतीची. मी अर्ज केला. प्रवेश मिळाला. सप्टेंबर महिना असेल, प्रवेशाचं पत्र मिळालं आणि मी रिमांड होमच्या आमच्या साहेबांबरोबर ट्रंक आणि वळकटी (बिछाना) घेऊन गारगोटीस गेलो. प्राचार्यांना भेटलो. प्राचार्य होते अमरसिंह राणे. ऑफिसच्या बाहेर पल्लेदार बोर्ड, गणवेशधारी शिपाई पाहन मी बुजलेला होतो. माझ्यासारखेच दोन विद्यार्थी बेळगावहून आलेले. आम्ही राणे सरांना भेटलो. ते दोन अन्य विद्यार्थी राणे सरांच्या परिचितांकडून आलेले. कॉलेज सुरू व्हायला वेळ असल्याचं कळलं. त्या वेळी गणपतीनंतर मौनी विद्यापीठातलं आमचं ग्रामभारती महाविद्यालय सुरू व्हायचं. सरांनी प्रवेश, हॉस्टेल, मेस असे सारे सोपस्कार मोठ्या आस्थेने पूर्ण करवून घेतले. अकरा वाजता आलेली आमची स्वारी. हे सारं व्हायला एक-दीड होऊन गेला. त्या वेळी हॉस्टेल, मेस सुरू व्हायची होती. गावात हॉटेल एखादं. तिथंही जेवणाची वेळ संपल्याचं कळलं. राणे सर आम्हा पाचजणांना (तीन विद्यार्थी आणि दोन पालक) घरी घेऊन गेले. त्या सर्वांमागे प्राचार्य अमरसिंह राणे यांचा जो माणुसकीचा गहिवर होता, तो आजही सुमारे पन्नास वर्षे उलटून गेली तरी माझा पिच्छा पुरवीत आहे. त्या दिवशी आम्ही इतके सारेजण अचानक जाऊनही त्यांच्या पत्नी माईंनी ज्या मायेनं आम्हा सर्वांना हसतमुखाने वरणभात, भाकरी, भाजी खिलवली त्यात जीव ओतलेला होता खरा!
 ऑक्टोबरच्या सुरुवातीस आमचं कॉलेज सुरू झालं. प्राचार्य राणे सर आम्हाला इंग्रजी शिकवीत. एच. जी. वेल्सची ‘इनव्हिजिबल मॅन' ही कादंबरी अभ्यासक्रमात लावलेली होती. आम्ही अधिकांश विद्यार्थी इंग्रजीत ‘३५ झिंदाबाद' वाले होतो. त्यांचे इंग्रजी कानांना ऐकायला बरं वाटलं तरी मेंदू काही स्वीकारायचा नाही. सर सोपं करून शिकवायचा आटापिटा करीत; पण आमच्या मर्यादा होत्या. इंग्रजीला ‘वाघिणीचे दूध' का म्हणतात, ते कॉलेजला गेल्यावर कळलं. पुढे तर मार्टिनचं व्याकरणाचं अख्खं पुस्तक १00 मार्काना आलं. सर आधी प्राचार्य, नंतर इंग्रजीचे प्राध्यापक व पुढे एफ. वाय.ला ते आमचे एन. सी. सी. ऑफिसर, कॅप्टन म्हणून आले.

 पाकिस्तान, चीनचं युद्ध नुकतंच होऊन गेलेलं होतं. एन.सी.सी.मध्ये जाण्याबद्दल सर्वच विद्यार्थी उत्सुक असत. त्या वेळी एक प्रकारची राष्ट्रीय भावना विद्यार्थ्यांत बलवत्तर होती. मी अर्ज केला; पण मेडिकलमध्ये नापास.

माझे सांगाती/२७