पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काढली. म्हणजे चॉकलेटच्या पैशांत पुस्तक. रुपयात पुस्तक म्हणजे तुकाराम वाण्याचाच धंदा! तो सतीश तुकाराम महाराजांच्या तल्लीनतेने टाळ मृदंगाच्या गजरात करताना मी पाहिला आहे. व्यवसायातही समाधीयोग, अनहत नाद मी केवळ नि केवळ सतीशमध्येच अनुभवला आहे, सतीश केवळ मुद्रक नाही, तर प्रकाशकही आहे. हे फार कमी लोकांना माहीत असेल, त्याचं ‘शब्दवेल' नावाचे प्रकाशन आहे. त्याची शब्दमुद्रा पाहिली की त्याची कलात्मकता लक्षात येते. ‘माझे एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न' पुस्तक त्याने छापले. तो छापण्यात उत्साही व विकण्यात वैरागी गृहस्थ, छापतो नि त्याचे गठे उरावर घेऊन झोपतो. यासाठी त्याला केव्हातरी नोबेल मिळेलच! ज्या विक्रेत्यांना देतो, ते देतील तेव्हा पैसे घेणारा हा एकमेव मराठी प्रकाशक.
 सतीशकडे ‘अभिरुची' नावाच्या ख्यातनाम मासिकाचे हक्क आहेत. ते सुरू करण्याचा त्याचा इरादा आहे. वरचे गठ्ठ संपले की बहुधा तो हा नवा आतबट्याचा व्यवसाय सुरू करेल. शेखचिल्ली नि सतीशमध्ये मला बरेच साम्य आढळते. 'बुडत्याचा पाय खोलात' ही म्हण सतीशच्या चरित्रातूनच बहुधा आली असावी अशी मला दाट शंका आहे. नव्हे, खात्रीच म्हणा! हे सर्व कमी म्हणून की काय, परवा भेटल्यावर म्हणाला की, आता प्रेस कामगारांना चालवायला देणार आहे. एकाच जन्मात एकाच वेळी जे गांधी नि मार्क्स वाचतात त्यांची अशी गोची असते. ते एकाच वेळी विश्वस्त नि फकीर होऊ इच्छितात. विश्वस्त व्हायचं तर आश्वस्त संपत्ती असावी लागते. ते टाटा, बजाज, अंबानीच करू जाणे. फकीर व्हायचं तर निराला, कबीर, सुर्वे व्हावं लागतं. सतीश दोन्ही लायनीत मिसफिट! मुळात फकीर असलेला माणूस विश्वस्त कोणत्या संपत्तीचा होणार, असा जर तुमचा प्रश्न असेल तर मी सांगेन त्याच्याकडे धान्याचे दामाजीचं गोदाम नसेल; पण माणूस नावाचं जगडलेलं मोहळ घेऊन झुलणारा सतीश नसलेल्यांची खंत न बाळगता असलेल्यांचा अभिमान मिरवणारा तो नम्र मुद्रक आहे खरा!

 सतीश पाध्ये त्यांच्या संपर्कात येणा-या प्रत्येकावर आपली सभ्यतेची मुद्रा नुसती उठवत नाहीत, तर कोरतात हे मी अनुभवले आहे. त्यांच्या मुद्रणालयातील कामगार त्यांना मालक म्हणत नाहीत. भैय्या म्हणतात. त्यांनाही माहीत आहे की सतीश कधी ‘भाई' होऊ शकत नाहीत. भाई होण्यासाठी व्यवहारकुशलता लागते. उँगली टेढी करने की कला' त्याला कधीच जमणार नाही. त्याचं वानप्रस्थ आयुष्याचं स्वप्न आहे. उरलं सुरलं वाचायचं' अशी उसंत त्याला मिळावी असे मनस्वी वाटते. आराम करायला पण तशी वृत्ती लागते. ती

माझे सांगाती/११५