पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सतीशमध्ये मला दिसली नाही. खरे तर तिचा मागमूसही त्याच्यात नाही. मग हे स्वप्न सत्य होणार कसं? असा प्रश्न आहे.

 माणसाची सभ्यता अशी टोकाची असावी की ती जगासमोर आणण्याची ऊर्मी इतरांना व्हावी. आज मी समाजातले ‘अमृत महोत्सव', 'गौरव समारंभ ‘गौरव ग्रंथ' पाहतो. आपणच आपली आरती ओवाळून घ्यायचा हा प्रकार. तोही पदरमोड करून. या पार्श्वभूमीवर त्यांच्या मित्राला सतीशची टिमकी नगारा म्हणून वाजवावी असे वाटणे यात समान सभ्यता टिकून असल्याचा एक आश्वासक स्वर दिसून येतो. तो मला अनुकरणीय वाटतो. जग बिघडले आहे। खरे; पण बुडलेले नाही, ही गोष्ट सामाजिकदृष्ट्या कमी महत्त्वाची नाही. रमेश पाटील यांच्यासारखा सत्शील मनुष्य. तो सतीशचं कॅलेंडर छापतो अन् आता तो गौरव अंक काढतोय. 'हेही नसे थोडके.' यात उभयपक्षी सद्भाव व सभ्यतेचे मला झालेले दर्शन जगण्याची उमेद वाढविणारे आहे. माणसांनी संत एकनाथांच्या टोकाच्या संयमाने सभ्यता जपावी. थुकणारा थकून जावा इतका संयम! त्या संयमी सभ्यतेचा सत्कार हा उद्याच्या सभ्य समाजनिर्मितीचा प्रारंभ ठरेल, असा मला विश्वास वाटतो. सतीशइतका संयम नि सभ्यता माझ्यात नसण्याची जाहीर कबुली देताना मला तिळमात्र शरम वाटत नाही. अशासाठी की, ती माझी मनस्वी अंतर्मुखी दाद आहे. आज या निमित्ताने माझ्या सभ्यतेचा प्रवास सुरू झाला. तो उद्या तुमच्यात पाझरेल, प्रतिबिंबित होईल. सारं जग सत् ईश म्हणजे सत्यशील होईल, ‘कारवाँ' बनणं काय असतं? “ज्योत से ज्योत जगाते चलो' म्हणजे मी घडलो, तुम्हीही घडाचा वस्तुपाठच ना?

माझे सांगाती/११६