पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/55

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होता. सामाजिक जलशांच्या रूपात दलित नाटकांची सुरुवात झाली. गोंधळ, जागर, भारूड, भजन, वग असं त्यांचं रूप होतं.
 वा. वि. भटांच्या अभिनव प्रकाशनांनी या काळातील डाव्या चळवळीचं साहित्य प्रकाशित केलं. त्यात त्यांनी आवर्जून दलित लोकसाहित्यास प्राधान्य दिलं होतं. भीमराव कर्डकांचं ‘आंबेडकरी जलसे : स्वरूप व कार्य' हे पुस्तक या संदर्भात लक्षात घेण्यासारखं आहे. त्यात त्यांनी किसन फागुजी बंदसोडे, कांबळे, वाघचौरे, गायकवाड, कर्डक, आहिरे, प्रभृतींच्या रचनांचे संदर्भ दिले आहेत. त्याकडे दलित नाट्याविष्काराच्या प्रारंभिक पाऊलखुणा म्हणून पाहावे लागेल. इतिहासाच्या दृष्टीने पाहायचे तर किसन फागुजी बंदसोडे पहिले दलित नाटककार मानावे लागतील. सन १९२४ चे त्यांचे ‘संत चोखामेळा' नाटक आढळते. उपहास शैलीतील हे नाटक भट-महार संघर्ष चित्रित करून अस्पृश्यता निर्मूलनाचा आग्रह धरताना दिसते. पुढे ग. वा. गोखलेंचे सन १९३६ चे ‘महारवाडा' नाटक हाती येते. केरूबुवा गायकवाडांचा ‘अस्पृश्य सत्यार्थ प्रकाशक जलसा' सन १९४० चा. त्यांनी ‘शाळेचा प्लॉट', ‘नवराबायकोचा झगडा', 'चिमणचा वग' लिहिल्याचे दिसून येते; परंतु दलित नाट्याला शास्त्ररूप आले ते मात्र स्वातंत्र्यानंतर. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, अस्पृश्यता निवारण, एक गाव - एक पाणवठा, दलित पँथर, राष्ट्रसेवा दल अशा अनेक कलापथकांतून ते विकसित झाले.

 स्वातंत्र्योत्तर काळात डॉ. प्रभाकर गणवीर यांचे सन १९५४ ला नोकरीच्या जाळ्यात' हे सामाजिक नाटक आले. नंतर पुढच्याच वर्षी सन १९५५ ला डॉ. म. भि. चिटणीसांचे ‘युगयात्रा' आले. ते त्याच वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्यासमोर सादर करण्यात आले होते. १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी या नाटकाचा प्रयोग नागपूरच्या दीक्षाभूमीवर करण्यात आला होता. डॉ. चिटणीसांचे ‘सावल्या' हे नभोनाट्य सन १९७२ ला प्रक्षेपित झाले होते. डॉ. गंगाधर पानतावणे यांचे सन १९५७ ला 'माणुसकीचे बंड' प्रकाशित झाले. सन १९७३ ला त्यांनी ‘मृत्युशाला', 'मुखवटा' सारख्या एकांकिकाही लिहिल्या. सुरेश वंजारी लिखित ‘मृत्युपत्र', प्रा. दत्ता भगतलिखित ‘पिंज-यातील पोपट' (१९७२), 'एकटी' या एकांकिका उल्लेखनीय होत. श्री. गुडघे लिखित ‘बुद्धं शरणं गच्छामि', श्री. कारंडे लिखित ‘नवी वाट', अशोक अहिरेचं ‘समतेचा विजय' हे वगनाट्य, खुशाल कांबळेचं ‘ग्रामराक्षस', बाबूराव गायकवाडांचं नातं', श्रीकांत लाललिखित 'गणपतीची धमाल आणि उंदराची कमाल' हे विनोदी नाटक या सर्व छोट्या-मोठ्या प्रयत्नांतून दलित नाटक व रंगभूमीचा विकास झाला आहे.

मराठी वंचित साहित्य/५४