पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/56

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 साठोत्तर कालखंड हा दलित नाटक व रंगमंचाच्या दृष्टीने अशासाठी महत्त्वाचा आहे की, हा काळ मराठी दलित साहित्याचा चरम विकासाचा असल्याने त्याला सुवर्णकाळाचे वैभव लाभले. या काळात सुरेश मेश्राम यांनी रंगिंग', 'व्हिएतनाम', 'प्लेझिया', ‘हा दोष कुणाचा?' सारखे समकालीन विषय व प्रश्नांची हाताळणी आपल्या उपरोक्त एकांकिकेतून केली. या एकांकिकांपैकी काही आधारित होत्या. त्यांचे प्रयोग झाले हे विशेष. असाच प्रयत्न कमलाकर डाहाट यांनी केला. त्यांचे ‘नरबळी', ‘हत्याकांड', 'त्रिशुळाचे चौथे टोक' ही नाटके प्रतिक्रिया म्हणून लिहिली गेली. ती विषय, आशय, सादरीकरण अशा तीनही अंगांनी प्रभावी ठरली. कमलाकर डाहाट यांनी अनेक एकांकिकाही लिहिल्या आहेत. पैकी ‘पडद्यामागील पडदा', 'असाही एक दिग्दर्शक', 'चोरांनो, शतशः प्रणाम','अंगुलिमाल का प्रदर्शन’, ‘मृत्युदिन' उल्लेखनीय होत. प्रभाकर दुपारेलिखित ‘साता समुद्रापलीकडे' (१९७८) नाटिका संवाद व नाट्य दोन्ही दृष्टींनी प्रभावी ठरली. इ. मा. नारनवरेंची ‘विद्रोहाचे पाणी पेटते आहे, दलित चळवळीवर, विचारावर आधारित थेट भिडणारे हे नाटक होय. याच काळात प्रा. दत्ता भगतांचे चक्रव्यूह', 'ठिणगी' (१९७९), दया पवारांचे 'मुंबई नगरी', योगीराज वाघमारेंचे 'तमाशा',‘अगा जे घडलेच नाही', प्रेमानंद गज्वींचे ‘घोटभर पाणी' (१९७८), ‘एकीएके शून्य' (१९७९), श्रीकृष्ण राऊत यांचे 'ब्लाईंड शो' (१९७८), हेमंत खोब्रागडेंचे ‘सूर्यास्त', रत्नाकर मतकरींचे ‘लोककथा-७८' या सर्व नाटक, नाटिका, एकांकिका इत्यादी नाट्यकृतींतून दलित नाटक व रंगभूमी प्रौढ झाली. या नाट्यकृतींनी अस्पृश्यता, गावकुसाबाहेरचं जग, वंचित पात्रे, दलित चळवळ, दलितांचा माणूस म्हणून शोध, शिक्षण वंचितता, सामाजिक बहिष्करण, विविध हत्याकांडे, दंगली, युद्धे, दुष्ट प्रथा, प्राचीन मिथके, विद्रोह असे अनेक प्रकार, विषयांद्वारे दलित जाणीव व समस्यांना वाट मोकळी करून दिली. दलित नाटकांचे यश पुस्तक प्रकाशनांपलीकडे रंगमंचावर त्याचे सादरीकरण होय. नाटकाची ती अनिवार्य कसोटी मानली जाते. त्या निकषांवरही दलित नाटक यशस्वी ठरते.

 समग्रतः दलित साहित्याने जातिवर आधारित भेद व विषमतेचा विरोध करीत प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध उभा दावा मांडला. दलित माणसंच आहेत त्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे. तो दया म्हणून न मिळता सामाजिक न्यायाचा वाटा व अधिकार म्हणून मिळायला हवा, हे या साहित्याने प्रभावीपणे मांडले. स्वातंत्र्याच्या गेल्या सात दशकांच्या प्रवासात आरक्षणामुळे प्राप्त संधी-सुविधांमुळे दलितांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्तरावर

मराठी वंचित साहित्य/५५