पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/52

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मग शरणकुमार लिंबाळेनी ‘अक्करमाशी' (१९८४) आणि ‘बारामाशी (१९८६) लिहून अनौरस मुलांच्या वेदना मांडल्या. डॉ. किशोर शांताबाई काळेनी ‘कोल्हाट्याचं पोर' (१९९४) लिहून डोंबारी, कोल्हाटी, भटक्यांचं जगणं शब्दबद्ध केलं. या सर्वांतून त्या त्या समाजाच्या भाषा, पोशाख, चालीरीती, खानपान, परंपरा पुढे येऊ लागल्या. हे असं असतं का? असा प्रश्न समाज विचारता झाला, इतकं हे जीवन अनुल्लेखित होतं. मग दादासाहेब मोरेंचं 'गबाळ', नरेंद्र जाधवांचं ‘आमचा बाप आन आम्ही' (१९९३) आलं. ते बहुचर्चित ठरलं. 'मी असा घडलो' (२००८) हे डॉ. भालचंद्र मुणगेकरांचं प्राथमिक व अपूर्ण आत्मचरित्र असलं तरी वाचनीय आहे. उत्तम कांबळेचं ‘वाट तुडवताना' (२००३) उत्तम आहे. अशोक जाधवांची आत्मकथा ‘भंगार' (२०१८) अलीकडचे वाचनीय व अस्वस्थ करणारी म्हणून उल्लेखनीय.
 दलित स्त्रियांची आत्मकथनंही अशीच समाजास अस्वस्थ करून गेली. त्यात बेबी कांबळेचं ‘आमचं जिणं', शांताबाई कांबळेचं ‘माझ्या जल्माची चित्तरकथा' (१९८६), मुक्ता सर्वगौडलिखित ‘मिटलेली कवाडं' (१९८३), जनाबाई गि-हेंचं ‘मरणकळा', कुमुद पावडेंचं ‘अंत:स्फोट' (१९८१), ऊर्मिला पवारांचं ‘आयदान' (२००३), विमल मोरेंचं ‘तीन दगडाची चूल' (२000) अशा अनेक आत्मकथनांचा समावेश करावा लागेल. या स्त्री-आत्मकथनांनी दलित स्त्रीचं जिणं पशुवत असल्याची जाणीव करून दिली.
 आजही एकामागून एक दलित आत्मकथनं येत आहेत. मराठी साहित्यातील ही निळी पहाट होय. ही सारी आत्मकथने दलितांचा आत्मशोध होय. ती समाजभान प्रगल्भ करणारी ठरली. तिनं दास्ययुगाचा अंत केला. मान्यता, अधिकारांचे बंद दरवाजे उघडले. ही आत्मकथने समाजमनात अत्याचाराबद्दल चीड निर्माण करतात. त्यातून माणुसकीचं जग उगायला मदत होते. हीच या आत्मकथनांची देणगी व यश होय.

 मराठी दलित साहित्य कथा, कादंबरी, आत्मकथा, कविता, नाटक अशा विविध साहित्यप्रकारांतून विकसित झालं असलं तरी या साहित्यास जी समाजमान्यता मिळाली ती आत्मकथा आणि कवितेमुळेच. त्यातही दलित पँथरच्या कवींनी जे तीव्र संवेदी काव्य लिहिले ते क्रांतिकारी व प्रक्षोभक ठरलं ते त्यातील जुनी चौकट मुळातून उखडून टाकायच्या प्रतिज्ञाबद्ध प्रयत्नांमुळे. या कवितेने आपल्या भाव, भावना, उद्गार, धारणा, विचार करताना पूर्वमान्य शील, सभ्यता यांच्या मर्यादा हेतुपूर्वक पायी तुडविल्या; कारण त्याशिवाय हजारो वर्षे चालत आलेली गुलामी, अस्पृश्यता नष्ट होणार नाही, हे त्यांना माहीत होते.

मराठी वंचित साहित्य/५१