पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/51

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संतकाव्यात दिसून येतात. प्राचीन मराठी काव्यातील अधिकांश संतकवी हे या ना त्या कारणाने जात, पात इत्यादींच्या आधारे बहिष्कृत, वंचित उपेक्षित होते. तत्कालीन सनातन वृत्तीच्या लोकांनी त्यांना या ना त्या कारणाने मंदिरप्रवेशापासून रोखले होते. संत ज्ञानेश्वरांसह त्यांची सर्व भावंडे समाजरूढीची बळी ठरली होती. संत नामदेवांना पायरीवर बसविणे, चोखोबांना मंदिरात न घेणे हे सारे प्रकार जातीय अत्याचाराचे होते. त्यांचे वर्णन त्यांच्या अभंग व चरित्रातून दिसते. मध्यकाळानंतरच्या इतिहासातही समाजबहिष्काराची गोष्ट नित्याची होती. साने गुरुजींनी आमरण उपोषण करीपर्यंत दलितांना मंदिरात प्रवेश नव्हता. त्यांच्या वस्त्या गावाबाहेर होत्या. त्यांना भुंकण्याचा अधिकार नव्हता. घाट, विहिरी स्वतंत्र होत्या. पंक्तिभेद होता. त्यांचा स्पर्श, सावली विटाळ मानली जायची. उपाहारगृहात प्रवेश नव्हता. घरोघरी चहाचे कप वेगळे होते. सवर्णांच्या घरात प्रवेश नव्हता. मसणवाटे वेगळे होते. या सर्व अन्याय, अत्याचारांच्या घटना, प्रसंगांची नोंद मराठी साहित्याच्या सर्व प्रकारांत आढळते.

 आत्मचरित्र / आत्मकथन हा साहित्यप्रकार आधुनिक होय. त्यामुळे दलित आत्मकथनांची सुरुवातही आपणास आधुनिक काळातच दिसून येते. तत्कालीन वृत्तपत्रांतून, नियतकालिकांतून, थोरामोठ्यांच्या चरित्रांतून दलितांवरील अत्याचारांचे वर्णन आढळत असले तरी समग्र आत्मकथन असे मराठी दलित साहित्यात आणीबाणीनंतरच आले. दया पवार यांच्या 'बलुतं' (१९७८) पासून त्याचा प्रारंभ झाला. मग सन १९७९ मध्ये प्र. ई. सोनकांबळे यांचे ‘आठवणींचे पक्षी', आणि माधव कोंडविलकरांचे 'मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे' आले. या आत्मकथनांनी दलितांचे दैन्य वैशीवर टांगले. शिक्षित मध्यमवर्ग हा एकूण समाजाचे हे वाचून हादरणे स्वाभाविक होते. पाठोपाठ लक्ष्मण मानेंचे ‘उपरा' (१९८०) प्रकाशित झाले. भटक्या जाति-जमातीचं जिणं त्यांना प्रभावीपणे मांडून साडेतीन टक्क्यांची मनमानी संस्कृती नाकारत साहित्य कुणाचे? कुणासाठी? त्याची परिमाणे असे मूलभूत प्रश्न उपस्थित केले. मग शंकरराव खरात यांच्यासारख्या संयत, संयमी कार्यकर्त्यांच ‘तराळ अंतराळ' १९८१ मध्ये आलं आणि त्यांनी बलुतेदारीचं जिणं म्हणजे माणूसपण नाकारणारं कसं असतं हे दाखवून दिलं. त्यातून महार, मातंग, सुतार, लोहार, कुंभार, चांभार, न्हावी, सोनार, ग्रामजोशी, गुरव, परीट, कोळी या बारा बलुतेदारांचं आणि तेली, तांबोळी, साळी, धनगर, शिंपी, माळी, गोंधळी, डवरी, भाट, ठाकूर, गोसावी, जंगम, मुलाना, वाजंत्री, घडसी, कलाकार, तराळ, भोई या १८ अलुतेदारांचं जिणं समाजापुढे आलं.

मराठी वंचित साहित्य/५०