पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/53

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मराठी दलित काव्य सन १९६० नंतर अधिक प्रभावी ठरले. नारायण सुर्वेचे काव्यसंग्रह 'ऐसा गा मी ब्रह्म' (१९६२), 'माझे विद्यापीठ' (१९६६), ‘जाहीरनामा' (१९७५), ‘सनद' (१९८२), नव्या माणसाचे आगमन' (१९९५) आणि ‘गवसलेल्या कविता' (१९९५) मधील कवितांतून शोषणग्रस्त माणसांच्या व्यथा, वेदना, शब्दबद्ध केल्या. त्या जातीय परिघाबाहेर जाऊन वंचित माणसाची तळी उचलतात. त्यात हमाल, पोस्टर चिकटवणारा, हातगाडी ओढणारा कामगार, दलित, शेतकरी, कुणबीण सारे येतात. त्यांच्या लेखीचं दलितत्त्व म्हणजे विपन्न जीवन. शब्दांच्या हाती खड्ग सोपवणारा हा कवी ‘आम्ही पेरीत नसतो युद्ध, आम्ही निर्मित असतो बुद्ध' असे जेव्हा म्हणतो, तेव्हा युद्ध आणि शांतीचा विवेकच समजावतो. हा कवी सतत अस्वस्थ असतो. म्हणून त्याची कविता ‘काळजाचा ठसका' बनून येते. ती जीवनाशी एकनिष्ठ असते. चेतवा वीज पणतीने' म्हणणारा हा कवी वंचितांच्या अमर्याद सामर्थ्यावर प्रचंड विश्वास व आस्था व्यक्त करतो. ‘जीवनाचे पिळून पिळे'सारखी शब्दरचना शोषणातील पशुता रेखाटते. ‘प्रकाशाचे छाटून हात’, ‘वादळाची करून वात' अशा शब्दकळांतून सुर्वे आपली कविता क्रांती व परिवर्तनाची मशाल असल्याचेच सिद्ध करतात. त्यांच्या कवितेत साताजन्माच्या दारिद्र्याची झीट आहे. ही कविता क्रांतीसाठी सर्वस्व समर्पणास कृतसंकल्प आहे.

 नारायण सुर्वेच्या सबुरीशी फारकत घेत क्रांतीच्या ठिणग्या उडविणारी कविता म्हणून नामदेव ढसाळांच्या कवितेकडे पाहावं लागतं. दलित काव्याची ज्यांना ओळख करून घ्यायची आहे त्यांना नामदेव ढसाळांच्या 'गोलपीठा' (१९७२), ‘मूर्ख म्हाता-याने डोंगर हलविला' (१९७५), ‘प्रियदर्शनी, आमच्या इतिहासातले एक अपरिहार्य पात्र' (१९७६), 'तुही इयत्ता कंची' (१९८१), 'खेळ' (१९८३), ‘गांडू बगीचा' (१९८६), ‘या सत्तेत जीवन रमत नाही' (१९९५) मधील कविता वाचण्यास पर्याय नाही. या कवितांनंतरही वर्तमान शतकात आलेले ‘निर्वाणा अगोदरची पीडा' आणि 'चिंध्यांची देवी आणि इतर कविता' येत राहिल्या. प्रत्येक संग्रहातील कविता विकासाच्या नव्या पाऊलखुणा दाखवितात. हा कवी 'लिटल मॅगेझीन्स’, ‘दलित पँथर' अशा साहित्यिक व राजकीय सामाजिक चळवळींतून वर आलेला असल्याने ढसाळांच्या कवितेची वैचारिक बैठक पक्की आहे. ती एक प्रामाणिक कविता आहे. त्यांच्या राजकीय जाणिवा बदलल्या तरी त्यांनी वर्गीय जाणिवांना तिलांजली नाही दिली. त्यांच्या कवितेस उदासीनतेचा विराट स्पर्श आहे. ती प्रश्नचिन्ह निर्माण करणारी कविता आहे. ‘कुणालाही गुलाम करून नये, लुटू नये' असं बजावणारी ही कविता ‘माणसाचे गाणे गावे माणसाने' म्हणत हातात हात देते. ईश्वराला

मराठी वंचित साहित्य/५२